सचिन सावंत यांचा काँग्रेस प्रवक्तेपदाचा राजीनामा; लोढेंच्या बढतीमुळे सावंत नाराज?

| Updated on: Oct 19, 2021 | 5:21 PM

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. या नियुक्त्यांवर नाराज होऊन काँग्रेस अध्यक्ष सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. (Maharashtra Congress spokesperson Sachin Sawant resigns from his post)

सचिन सावंत यांचा काँग्रेस प्रवक्तेपदाचा राजीनामा; लोढेंच्या बढतीमुळे सावंत नाराज?
Sachin Sawant
Follow us on

मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. या नियुक्त्यांवर नाराज होऊन काँग्रेस अध्यक्ष सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. अतुल लोंढे यांना मुख्य प्रवक्तेपद दिल्याने सचिन सावंत यांनी राजीनामा दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.

सचिन सावंत हे गेल्या दहा वर्षापासून काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. मधल्या काळात त्यांना विधानपरिषदेवरही पाठवणार असल्याची चर्चा होती. सावंत यांनी सातत्याने भाजपला अंगावर घेतले होते. काँग्रेसची नेमकी भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि भाजपला सडेतोड उत्तर देण्याचं कामही ते करत होते. शिवाय पक्ष चर्चेत ठेवण्याचंही काम त्यांनी केलं होतं. मात्र, आज झालेल्या नियुक्त्यांमध्ये त्यांना डावलून अतूल लोंढे यांना मुख्य प्रवक्तेपद देण्यात आलं. त्यामुळे सावंत नाराज झाले असून या नाराजीतूनच त्यांनी प्रवक्तेपदाचा राजीनामा दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. सावंत यांनी त्यांचा राजीनामा काँग्रेस हायकमांडला पाठवल्याचं सूत्रांनी सांगितलं.

लोंढे पटोले समर्थक

दरम्यान, आज जाहीर झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये नाना पटोले यांच्या समर्थकांचीच सर्वाधिक वर्णी लागली आहे. अतुल लोंढे हे पटोले समर्थक असल्यानेच त्यांची मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती झाल्याचं सांगण्यात येत आहे.

देवानंद पवार सरचिटणीस

माध्यम आणि संवाद विभागाची तसेच मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अतुल लोंढे यांच्याकडे सोपवण्यात आली असून सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत आणि जाकीर अहमद यांचाही या समितीत समावेश आहे. अध्यक्ष व मान्यवरांच्या दौऱ्याच्या नियोजनाची जबाबदारी प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांच्याकडे देण्यात आली आहे. तर सोशल मीडिया विभागाचा प्रभार प्रदेश सरचिटणीस विशाल मुत्तेमवार यांच्याकडे देण्यात आला आहे.

आघाडी संघटना, विभाग व सेल

आघाडी संघटना, विभाग व सेल या विभागाच्या प्रमुखपदी माजी मंत्री व प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुनिल देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर हे सहप्रमुख असतील. तर प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आमदार अभिजीत वंजारी हे सहप्रमुख व प्रदेश सरचिटणीस, तर माजी आमदार दिप्ती चवधरी यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

निवडणूक व्यवस्थापन समिती, प्रशिक्षण विभाग

निवडणूक व्यवस्थापन समितीच्या प्रमुखपदी प्रदेश सरचिटणीस रमेश शेट्टी, सहप्रमुखपदी प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, मुनाफ हकीम व सदस्यपदी विश्वजीत हाप्पे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशिक्षण विभागाच्या प्रमुखपदी प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार रामहरी रूपनवर, सहप्रमुखपदी शाम उमाळकर, संजय बालगुडे, सदस्यपदी डॉ. हेमलता पाटील आणि जयश्री शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राजकीय कार्यक्रम नियोजन समिती, बुथ विस्तार समिती

राजकीय कार्यक्रमाच्या नियोजन समिती प्रमुखपदी माजी खासदार व प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई, सहप्रमुखपदी प्रदेश उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील, सदस्यपदी सुर्यकांत पाटील व प्रशांत गावंडे यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्षांनी केली आहे. बुथ विस्तार समितीच्या प्रमुखपदी प्रदेश उपाध्यक्ष भा. ई. नगराळे, सहप्रमुखपदी प्रदेश उपाध्यक्ष हरिष पवार, सदस्यपदी प्रदेश सचिव सचिन साठे व नंदा म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

संबंधित बातम्या:

सरकारचा मोठा निर्णय ! राज्यात उपहारगृहे, हॉटेल्स रात्री 12 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा

सर्वस्तरातून टीकेनंतर सरकारला जाग, आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी 8 निरीक्षकांची नेमणूक

मुंबई महापालिकेवर भाजपचा इंजेक्शन घोटाळ्याचा आरोप, प्रसाद लाड यांचा शिवसेनेला सवाल

(Maharashtra Congress spokesperson Sachin Sawant resigns from his post)