Maharashtra Rain : बाप्पा पावला, पावसाने ताल धरला! मुंबईसह राज्याला पावसानं झोडपले, 20 जिल्ह्यांना मोठा अलर्ट
Maharashtra Heavy Rain: बाप्पााच्या आगमनापूर्वी मुंबईसह राज्याला पावसानं झोडपलं. पाऊस पुन्हा धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला. या 20 जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यासह खानदेश विदर्भातील अनेक जिल्हे आणि भागांना पावसाची मोठी आस आहे.

गणेशोत्सवाचा उत्साह असतानाच बाप्पााच्या स्वागतासाठी पावसानेही ताल धरला. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. दक्षिण छत्तीसगडमार्ग हा कमी दाबाचा पट्टा विदर्भासह मराठवाड्याकडे सरकण्याची शक्यता आहे. राज्यावर सध्या आभाळमाया आहे. राज्यात वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या गडगडाटासह पावसाचा जोर दिसेल. नंदुरबार, धुळे आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर धो धो पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्राला पाऊस चिंब भिजवणार आहे. गेल्या 20-25 दिवसांपासून पावसाचा खंड आहे. पीकं धोक्यात आली आहे. तर दुसरीकडे जलसाठेही प्रभावित झालेले असताना पावसाचा सांगावा आल्याने दिलासा मिळाला आहे.
20 जिल्ह्यांना मोठा अलर्ट
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात काही भागात ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. दमदार पाऊस पडेल. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भासह राज्यात दूरपर्यंत पाऊस धडकेल. नंदुरबार, धुळे आणि नाशिक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबईसह इतर जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. इतर भागात मेघगर्जनेसह धो धो पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईसह उपनगरात पावसाची रिपरिप
मुंबई उपनगरात कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर आणि अंधेरी परिसरात रात्रीपासून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत.अनेक भागात काल रात्रीपासून अधूनमधून पाऊस पडत आहे. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत मान्सूनने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. गणरायाच्या आगमनापूर्वी वसई विरार मध्ये रात्रभर पावसाने हजेरी लावली आहे. रिमझिम सह अधूनमधून जोरदार पाऊस सलग सुरू आहे. सलग पडणाऱ्या पावसाने काही सकल भागात पाणी साचायला सुरवात झाली आहे. आभाळ पूर्ण भरून आले आहे. दिवसभर असाच पाऊस सुरू राहीलातर गणरायाच्या आगमनात विघ्न निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या सकाळ च्या वेळात शहरातील वाहतूक, आणि विरार वून चर्चगेट कडे जाणाऱ्या लोकल सुरळीत सुरू आहेत
धुळ्यात 43 दिवसांनंतर पाऊस
धुळे शहरासह जिल्ह्यात तब्बल 43 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाने हजेरी लावली आहे. पहाटेपासून शहरात रिमझिम पाऊस सुरू झाल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे गणेशमूर्ती विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली, तर शेतीच्या दृष्टीने या पावसाने काही पिकांना फायदा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, कपाशीच्या बोंडांवर रोग पडण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
नागपूर परिसरात पावसाची हजेरी
20 ते 22 दिवसांचा खंड पडल्यानंतर राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये पावसाचं आगमन झाले. पावसामुळे खरीपातील काही पिकांना फायदा होण्याची शक्यता आहे. काल दुपारीही नागपुरात हलक्या पावसाच्या सरी बरसल्या होत्या. प्रादेशिक हवामान विभागाने पुढील दोन दिवस विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार शहरात पावसाला सुरुवात झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. पाऊस समाधानकारक झाल्यास पिकांना काहीसा दिलासा मिळून शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
गोंदियात पावसामुळे धान पिकाला संजीवनी
गोंदिया जिल्ह्यात काल रात्री झालेल्या पावसामुळे धान पिकाला काहीसा दिलासा मिळाला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी, धान पिकासाठी सध्या जोरदार पावसाची गरज कायम आहे. सप्टेंबर महिना सुरू होऊन दहा दिवसांचा कालावधी उलटला आहे. मात्र, जिल्ह्यात अद्यापही पावसाचा जोर वाढलेला नाही. यामुळे धान पीक संकटात सापडले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या 79 टक्के पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत तब्बल 93 टक्के पाऊस झाला होता. यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. सध्या धान पीक भरण्याच्या महत्त्वाच्या अवस्थेत आहे. मात्र, पावसाने दडी मारल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. काल रात्रीच्या पावसाने काहीसा दिलासा मिळाला असला, तरी धान पिकासाठी आणखी जोरदार आणि दमदार पावसाची गरज असून, गोंदिया जिल्ह्यातील शेतकर्यांना पावसाची प्रतिक्षा कायम आहे.