Tukaram Mundhe: चमकोगिरी होईल पण कामाचं मोजमाप… सोशल मीडियावरील प्रसिद्धीवरून तुकाराम मुंढे यांची खास पोस्ट व्हायरल, म्हणाले काय?
Tukaram Mundhe Social Media Post: अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त आणि धडाकेबाज सनदी अधिकारी यांचे पाय जमिनीवर असल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. अनेकांसाठी हिरो ठरलेले मुंढे या डोक्यात प्रसिद्धीची हवा गेली नसल्याचे त्यांच्या एका व्हायरल पोस्टवरून समोर आले आहे.

धडाकेबाज सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची लोकप्रियता चांगल्या चांगल्या नेत्यांनाही मागे टाकत आहेत. ते सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहेत. पण असे असले तरी त्यांच्या डोक्यात ही प्रसिद्धी घुसलेली नाही. त्यांचे पाय अद्यापही जमिनीवरच असल्याचे त्यांच्या एका व्हायरल पोस्टमधून समोर आले. सोशल मीडियावरील प्रसिद्धीबाबत त्यांनी मोलाचा सल्ला दिला आहे. त्यावर त्यांचे विचार मांडले आहेत. अनेकांसाठी हिरो ठरलेले मुंढे हे उगीच अनेकांचे आयडियल नाहीत, हे त्यांनी दाखवून दिले आहे. काय आहे ती पोस्ट? आणि का होत आहे ती व्हायरल?
चमकोगिरी होईल पण कामाचं मोजमाप
“समाजसेवा, जनसेवा ही केवळ प्रसिद्धीसाठी नाही, ती एक मोठी जबाबदारी आहे. सोशल मीडियावरील चमकोगिरी अथवा प्रसिद्धी हे चांगल्या प्रशासनाचे लक्षण असू शकत नाही,” अशी खणखणीत प्रतिक्रिया आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिली. त्यांनी सोशल मीडियावरील प्रसिद्धीचेही मोजमाप केले. त्यांच्या या परखड विचारांने प्रसिद्धीच्या धुंदीत जगणाऱ्यांना झणझणीत अंजन मानले जात आहे. आपल्यासाठी प्रसिद्धीपेक्षा लोकांचा विश्वास अधिक महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांच्या एक्स या अधिकृत हँडलवरून त्यांनी याविषयीचे विचार मांडले. प्रशासकीय, राजकीय आणि सामाजिक वर्तुळात या पोस्टची खास चर्चा सुरू आहे.
प्रसिद्धीच्या गर्तेत जनहिताचा विसर नको
प्रशासकीय कारभारावर ही मुंढे यांनी या पोस्टमधून परखड भाष्य केले. सरकारी अधिकाऱ्यांचे कर्तव्य काय आणि भूमिका काय असावी यावर त्यांनी पुसटशा ठसा उमटवला. नागरिक स्वतःला सुरक्षित अनुभवतात का? असा सवाल करत त्यांनी सरकारी विभागांच्या उत्तरदायीत्वावर बोट ठेवले. नागरिकांवर अन्याय झाल्यास या सरकारी संस्था, विभाग जनतेच्या बाजूने ठाम उभ्या राहतात का? त्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी मदत करतात का? असा सवाल करत त्यांनी सुशासनाचे महत्त्व अधोरेखित केले.
Public trust, Not visibility.
Public service is not a search for recognition. It is a commitment to responsibility.
Visibility may bring attention. Social media may amplify actions. But neither is the measure of good governance.
The real measure is whether citizens feel safer,…
— Tukaram Mundhe (@Tukaram_IndIAS) September 11, 2026
जनहित हेच सार्वजनिक हित असून वैयक्तिक प्रसिद्धीच्या शर्यतीत, प्रसिद्धीच्या गर्तेत अधिकाऱ्यांनी हे सार्वजनिक हित विसरू नये असा मंत्र त्यांनी दिला. डिजिटल युगात सोशल मीडियावरील प्रसिद्धीचा वापर वाढला आहे. अधिकारी आज त्या पदावर असतो उद्या दुसऱ्या ठिकाणी त्याची बदली होते. अधिकारी येतात आणि जातात. परंतु जनतेचा विश्वास शासकीय संस्थांनी कायम टिकवायला हवा. असा कारभार करा की अधिकारी नाही तर ती संस्था विश्वासपात्र ठरेल असा सार तुकाराम मुंढे यांनी या पोस्टमधून अधिकाऱ्यांवर बिंबवला.
