युद्ध आणखी भडकलं, रशियाचा युक्रेनवर भयंकर हल्ला, 500 ड्रोन डागले; 9 जणांचा मृत्यू
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आणखी भडकलं आहे. रशियाने युक्रेनवर भयंकर हल्ला केला आहे. यात 9 जणांचा मृत्यू झाला आहे.

रशियाच्या सैन्य दलाने शनिवारी युक्रेनवर भयंकर हल्ला केला. या भीषण हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. रशियाच्या हल्ल्याने रहिवासी वस्तीतील इमारतींचं मोठं नुकसान झालं आहे. रशियाच्या भीषण हल्ल्याने परिसरात पुन्हा भीतीचं वातावरण पसरलं आहे.
युक्रनेचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी स्पष्ट केलं की, रशियाने शनिवारी युक्रेनच्या विविध ठिकाणी 500 ड्रोन डागले. खरंतर रशियाने आता युक्रेनच्या अर्थव्यवस्थेवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. युद्धकालीन परिस्थितीत लोकांना मदत करण्याऱ्या ठिकाणांवर हल्ले सुरू आहेत. रशियाच्या सैन्याने युक्रेनमधील नागरिकांच्या कारवरही हल्ले केले आहेत. तर 90 मिनिटांत झालेल्या वेगवेगळ्या हल्ल्यात 3 जणांचा मृत्यू झाला. त्यांनी किराणा दुकानावर ड्रोन डागले. तर दोन पेट्रोल पंपावर ड्रोन डागल्याची माहिती समोर आली आहे.
ओडेसा बंदरावरही ड्रोन हल्ले
झापोरिझिया प्रदेशाचे राज्यपाल इव्हान फेडोरोव्ह यांच्या दाव्यानुसार, ड्रोन हल्ल्यात त्यांच्या भागातील दोन जण ठार झाले. तर 11 जण जखमी झाले. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचे मूळ गाव क्रिव्ही रिहमध्ये रात्री ड्रोन हल्ले करण्यात आले. तिथेही दोन जण ठार झाले. त्यांनी परिसरात अनेक कारखान्यांनाही लक्ष्य केल्याचे सांगण्यात येत आहे. काळ्या समुद्राच्या ओडेसा बंदरावरही हल्ला करण्यात आला. सलग दोन दिवस केलेल्या हल्ल्यात 40 जण जखमी झाले. मॉस्कोच्या नियंत्रणाखाली असलेल्या पूर्व डोनेत्सकमध्येही झालेल्या हल्ल्यात तीन जण दगावले.
व्यापारी जहाजही लक्ष्य
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या दाव्यानुसार, ओडेसा बंदरात लष्करी साहित्य घेऊन जाणाऱ्या व्यापारी जहाजावर हल्ला झाला. तसेच चोर्नोमोस्के बंदरातील दोन जहजांवरही हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर युक्रेनच्या सैन्यानेही चोख प्रत्युत्तर दिलं. त्यांनी कृत्रिम रबर उत्पादक असलेल्या प्रकल्पावर हल्ला केला. या हल्ल्यामुळे या प्रकल्पाला आग लागली. महापौर इल्या सुखीख यांनी या हल्ल्यावर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं की, या हल्ल्यामुळे तोगलियाट्टी भागातील अनेक निवासी इमारतीचं नुकसान झालं आहे. या हल्ल्यात एक व्यक्ती जखमी झाला.
