लॉकडाऊनमध्ये राज्यातील व्यापार क्षेत्राचे तब्बल 70 हजार कोटीचे नुकसान – ललित गांधी

| Updated on: May 14, 2021 | 7:26 PM

गुढीपाडवा आणि अक्षय तृतीया हे दोन महत्त्वाचे सण लॉकडाऊनच्या काळात व्यापाराशिवाय गेल्याने महाराष्ट्रातील व्यापार क्षेत्राला तब्बल 70 हजार कोटीचा फटका.

लॉकडाऊनमध्ये राज्यातील व्यापार क्षेत्राचे तब्बल 70 हजार कोटीचे नुकसान - ललित गांधी
ललित गांधी, व्यापारी संघटना
Follow us on

मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, लॉकडाऊन काळात राज्यातील व्यापारी वर्गाचे प्रचंड नुकसान झालं आहे. 5 एप्रिल पासून महाराष्ट्रात सुरू झालेल्या लॉकडाऊन दरम्यान जीवनावश्यक आणि अत्यावश्यक क्षेत्र वगळून अन्य सर्व व्यापार बंद आहेत. त्यामुळे राज्यातील व्यापार क्षेत्र मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे. गुढीपाडवा आणि अक्षय तृतीया हे दोन महत्त्वाचे सण लॉकडाऊनच्या काळात व्यापाराशिवाय गेल्याने महाराष्ट्रातील व्यापार क्षेत्राला तब्बल 70 हजार कोटीचा फटका बसल्याची माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि राष्ट्रीय व्यापार महासंघाचे संघटनमंत्री ललित गांधी यांनी दिलीय. (70,000 crore loss to traders in the state in lockdown)

राज्यातील व्यापार क्षेत्र असंघटित आणि अकुशल लोकांना सर्वाधिक रोजगार पुरवत असते. राज्याच्या महसुलात व्यापार क्षेत्राचा वाटा मोठा आहे. हे क्षेत्र अडचणीत आल्याने व्यापारी, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्यावर अवलंबून असणारे कर्मचारी हे प्रचंड अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे या क्षेत्राला व्यापार सुरू करण्याची परवानगी देण्याबरोबरच भरीव आर्थिक पॅकेज देण्याची मागणी राज्य सरकारकडे केल्याची माहिती ललित गांधी यांनी दिली. जवळपास गेला दीड महिना संपूर्ण बंद राहिल्यामुळे, अनेक छोटे व्यापारी आर्थिकरित्या डबघाईला आले आहेत. अनेकांचे भांडवल संपुष्टात आले आहे. व्यापार क्षेत्राचे गेल्या वर्षभरातील दोन मोठ्या लॉकडाऊनमुळे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. हे क्षेत्र टिकवण्यासाठी सरकारकडून मदतीची आणि सहकार्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सरकारने व्यापाऱ्यांचे तीन महिन्याचे विज बिल आणि बँक कर्जावरील व्याज माफ करावे, अशी मागणीही गांधी यांनी केलीय.

‘भाडे, मालमत्ता कर, लाईट बिल माफ करा’

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालकीच्या दुकान गाळ्यांचे तीन महिन्याचे भाडे माफ करावे. अन्य सर्व व्यापाऱ्यांना तीन महिन्याचा मालमत्ता कर माफ करावा. भांडवल संपुष्टात आल्याने, छोट्या आणि मध्यम व्यापाऱ्यांना त्यांच्या वार्षिक उलाढालीच्या दहा टक्के इतकी रक्कम वार्षिक तीन टक्के व्याजाने कर्ज रूपाने उपलब्ध करून द्यावी. या प्रमुख बाबींचा समावेश करून भरीव आर्थिक पॅकेज राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्व व्यापाऱ्यांसाठी तात्काळ जाहीर करावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केल्याची माहितीही ललित गांधी यांनी दिली.

पुढील भूमिका काय? 2 दिवसांत निर्णय

व्यापाऱ्यांचा हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून, राष्ट्रीय स्तरावरील शिखर संघटनांनी सुद्धा राज्य आणि केंद्र सरकारकडे याविषयी व्यापाऱ्यांची भूमिका आग्रहाने मांडावी, अशी विनंती फिक्की व कॅटच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांकडे केल्याची माहिती गांधी यांनी दिली. राज्यातील सर्व संघटनांच्या मध्ये विविध पर्यायावर विचार केला जात असून, सरकार कडून तात्काळ निर्णय न झाल्यास पुढील भूमिका काय घ्यावी, याविषयी दोन दिवसात निर्णय घेतला जाणार असून, सरकारने व्यापाऱ्यांचा अंत न पाहता ताबडतोब व्यापार सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केलीय.

संबंधित बातम्या :

पहिल्या लॉकडाऊनमधील नुकसान भरुन काढण्यासाठी जिद्दीनं राबला, दुसऱ्या लाटेनं युवा शेतकऱ्याच्या कष्टावर पाणी फेरलं

Video : कॅन्सर पीडित चिमुकल्याची कोरोनावर मात, डॉक्टर आणि नर्सेसचा आनंद गगनात मावेना!

70,000 crore loss to traders in the state in lockdown