
Maharashtra Politics: राजकारणातील रस्ते आणि गल्ल्या या कधीच भिंती घालून बंद केलेल्या नसतात, त्या एकमेकांशी जोडलेल्या असतात असं एक लोकप्रिय वाक्य आहे. राज्यातील राजकारणानं जणू अशीच अनेक धक्कादायकं वळणं घेतली आहेत. 2019 पासून तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा अशा राजकीय हिंदोळ्यावर विविध पक्षांचा अतिरेकी प्रवास सुरू आहे. कोण-कुणाच्या फडात जाईल आणि धिंगाणा होईल याची काही शाश्वती उरली नाही. कट्टर हाडवैरी एकत्र आले आहेत. तर मित्र शत्रू सारखे वागत आहेत. त्यामुळे महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या हंगामात शत्रू, मित्र होतील. तर मित्र शत्रू होतील अशी शक्यता अनेक ठिकाणी दिसून येत आहे.
ठाकरे ब्रँड करिष्मा दाखवणार?
गेल्या 18 वर्षातील वितुष्ट विसरून यावर्षी मे महिन्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे वरळी डोममध्ये मराठीच्या मुद्दावर एकत्र आले. जे बाळासाहेब ठाकरे यांना जमलं नाही. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवले असे राज ठाकरे त्यावेळी बोलले. तर एकत्र आलो आहोत, ते एकत्र राहण्यासाठी असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला होता. त्याची प्रचिती काल बुधवारी दोन्ही पक्षांच्या युतीवरुन आली. मुंबई महापालिका निवडणुकीसोबतच जवळपास 7 महापालिकांमध्ये मनसे आणि उद्धव सेना एकत्र लढणार आहेत. अद्याप दोन्ही पक्षांनी जागा वाटपाचा पत्ता उघड केला नाही. पण युतीचे घोडे एकदाचे नहाले. शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून राज ठाकरे यांनी अनेकदा उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली. तर उद्धव ठाकरे यांनी त्यांना भाजपच्या मैत्रीवरून डिवचलं होतं. पण आता राजकारणातील विळ्या-भोपळ्याचं हे राजकारण तुर्तास इतिहासजमा झाले आहे. भाजपच्या दृष्टीने दोन्ही ठाकरेंची ही युती आषाढीला भेटायला महाशिवरात्री आली असा जरी असला तरी मुंबई महापालिकेत यामुळे नवीन समीकरणं मांडली जाणार आहे.
महायुतीत खलबतं,रस्सीखेच नी पळवापळवी
महायुतीत भाजपकडे सत्तर हत्तीचं बळ आलेले आहे. विधानसभेपाठोपाठ स्थानिक स्वराज्य संस्थेतही त्यांनी बहुमताचे तोरण लावले आहे. त्यामुळे भाजपचा उत्साह दुणावला आहे. तर दुसरीकडे भाजपमध्ये शिंदे सेना आणि अजितदादा या मित्रपक्षातील अनेकांनी प्रवेशासाठी रांगा लावल्याने या फोडा फोडीने महायुतीत वितुष्ट आले आहे. ठाणे, कल्याणसह नवी मुंबईत शिंदेसेना आणि भाजपमध्ये संघर्ष पेटला आहे. कोकणात काल परवा राणे बंधुतील शिमगा हे त्याचेच प्रतिक आहे. तर दुसरीकडे अजितदादांनी पिंपरी-चिचवड, पुण्यात भाजपचे अनेक नगरसेवक पळवले आहेत. तर सोलापूरसह इतर ठिकाणी भाजपने राष्ट्रवादीच्या नेत्यांना प्रवेश देऊन उट्टे काढले आहेत.त्यामुळे मनात शंका घेऊनच वाटाघाटीच्या फेऱ्या सुरु असल्याचे दिसते.
काँग्रेसचे ‘वंचित’ प्रेम
विधानसभेवेळी वंचितने महाविकास आघाडीसोबत घरोबा करण्यासाठी प्रयत्न केला होता. उद्धव ठाकरे यांनी वंचितला जवळ करण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी समीकरणं जुळली नाही. आता मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसने अगोदरच स्वबळाचा नारा दिला. त्यांचे मन वळवण्याचे उद्धव सेनेचे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसला योग्य जागा मिळत नसल्याच्या नाराजीतून ठाकरे बंधुपासून शरद पवार यांची राष्ट्रवादी दुरावा करते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी, काँग्रेस, रासप आणि वंचित असे नवीन समीकरण मुंबई महापालिकेसाठी जुळून येण्याची एक शक्यता वर्तवली जात आहे. वंचितने काँग्रेसपुढे 43 जागांचा प्रस्ताव दिला आहे. जर मुंबई महापालिकेत सूत्र जुळलं, तर कदाचित राज्यातील इतर महापालिकेत वंचित आणि काँग्रेस असं समीकरण पुढे येऊ शकते. दोघांनाही त्याचा फायदा होईल. पण विधानसभेपर्यंत फटकून वागणाऱ्या काँग्रेसला वंचितच्या प्रेमाचा उमाळा आल्याची चर्चा सुरू आहे.
दोन्ही राष्ट्रवादीची ऐकी, महाविकास आघाडीत एक सूर नाही
पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिकेत भाजपने स्वबळाचा नारा देऊन अजितदादांना झटका दिला. तर या दोन्ही ठिकाणची सत्ता हातची जाऊ नये यासाठी आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली अखेरच्या टप्प्यात आल्या आहेत. अजितदादांची राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी एकत्र येण्याची औपचारिक घोषणा तेवढी बाकी आहे. याठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुती यांच्याविरोधात दोन्ही राष्ट्रवादींची एकत्रित आघाडीचा सामना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीतील उभी फुट विसरून दोन्ही पक्ष एकत्र येत असल्याचे अजब राजकीय समीकरण पुणेकरांना अनुभवायला येत आहे.
राज्यातील काही प्रमुख ठिकाणी ही गोळाबेरीज आहे. पण काही ठिकाणी स्थानिक आघाडी आणि स्थानिक युतीमुळे अजून खळबळजनक समीकरणं समोर आली तर आश्चर्य वाटण्याची गरज नाही.कारण राजकारणाचे सर्व मार्ग सत्तेकडे जातात हेच अंतिम सत्य आहे. त्यासाठी मग पक्ष विचारधारा आणि भूमिका या वंचित ठरतात हेच सत्तेचे सूत्र आहे.