हाय रे गर्मी! मुंबईवर सूर्यदेव कोपला, उष्णतेच्या लाटांनी नागरिक हैराण

Mumbai Heat Waves : मुंबईकरांवर यंदा उष्णतेचा मारा होण्याची चिन्हं आहेत. मार्च आताच कुठे सुरू झाला असतानाच तापमान उच्चांकावर पोहचले आहे. तापमानाने 38 अंशाचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे सलग दोन महिन्यात सूर्य देव मुंबईकरांची परीक्षा घेण्याची शक्यता आहे.

हाय रे गर्मी! मुंबईवर सूर्यदेव कोपला, उष्णतेच्या लाटांनी नागरिक हैराण
तापमान वाढीने मुंबईकर हैराण
Image Credit source: गुगल
| Updated on: Mar 01, 2025 | 9:23 AM

मुंबईकरांना यंदा उष्णतेच्या लाटेला तोंड देण्याची वेळ येणार आहे.मार्च आताच कुठे सुरू झाला असतानाच तापमान उच्चांकावर पोहचले आहे. तापमानाने 38 अंशाचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे सलग दोन महिन्यात सूर्य देव मुंबईकरांची परीक्षा घेण्याची शक्यता आहे. मागील पूर्ण फेब्रुवारी महिन्यात उष्णतेच्या लाटांनी नागरिकांना हैराण केले. आता संपूर्ण राज्यात मार्च आणि मे महिन्यात उष्णतेच्या लाटांची संख्या आणि तीव्रता अधिक राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

फेब्रुवारीतच मुंबईकरांना आलर्म

नुकताच संपलेला फेब्रुवारीचा पूर्ण महिना सरासरी पेक्षा उष्ण ठरला आहे. देशात फेब्रुवारी महिन्यात कमाल तापमान 27.58 अंश सेल्सिअस असते, मात्र यंदा ते 29.7 अंश सेल्सिअस राहिले आहे. किमान तापमान 13.82 अंश सेल्सिअस असते ते 15.2 अंश सेल्सिअस होते. सरासरीपेक्षा कमाल तापमान 1.49 तर कीमान तापमान 1.20 असं सेल्सिअस ने जास्त होते. 1901 पासूनच्या नोंदीनुसार यंदा फेब्रुवारी दुसर्‍या क्रमांकाचा उष्ण महिना ठरला आहे. 2023 च्या फेब्रुवारीत 29.44°c नोंद झाली होती. त्यामुळे येत्या दोन महिन्यात उष्णतेच्या झळांनी मुंबईकरांना घामाच्या धारा लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

गेल्या तीन दिवसात घामाच्या धारा

मुंबईकर उष्ण हवामानामुळे हवालदिल झाले आहेत. मागील तीन दिवस तापमानाचा पारा 38 अंशावर नोंदविला जात होता. मात्र शुक्रवारी तापमानात काहीशी घट झाली . सांताक्रुज येथे 35.3 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान ही घट काही दिवस कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे मुंबई सह राज्यभरातील नागरिकांनी मार्च आणि मे महिन्यात उष्णतेपासून सुरक्षित राहण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी असे अहवान ही करण्यात आले आहे.

पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा तापमानात वाढ

दरम्यान मुंबई पाठोपाठ पुण्यातील तापमानात सुद्धा हळूहळू वाढ होत आहे. पुण्यात तापमान 35 अंश सेल्सिअसच्या जवळपास आहे. दिवसभर निरभ्र आकाशामुळे उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. दुसरीकडे नाशिकसह छत्रपती संभाजीनगर, अकोला आणि नागपूरमध्ये सुद्धा तापमान वाढीला सुरुवात झाली आहे. विदर्भासह मराठवाडा आणि राज्यातील इतर भागात तापमान वाढ जाणवत आहे.