
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. आज या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलकांनी ठिय्या मांडला आहे. यावेळी काही आंदोलक हे सकाळच्या वेळेत टँकरच्या पाण्याखाली रस्त्यावरच आंघोळी करत असल्याचे दिसत आहे. तसेच आंदोलनासाठी आलेल्या मराठा बांधवांनी मिळेल त्या ठिकाणी वाहने पार्क करून चहा-नाश्ता बनवताना दिसत आहे. एकीकडे मराठा आंदोलक आंदोलनावर ठाम असताना दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात गुप्त बैठक पार पडली असून लवकरच मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार असल्याचे बोललं जात आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मध्यरात्री आंदोलनाची परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या जेवणासह इतर सोयीसुविधांची पाहणी केली. त्यातच आता बीड प्रकरणात बडतर्फ झालेले पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी रणजीत कासले यांनी मराठा आंदोलनात सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले. तर दुसरीकडे सरकारच्या बैठकांवर बैठका पार पडत आहे. काल मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात वर्षा बंगल्यावर जवळपास एक तास गुप्त बैठक पार पडली. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन हे वर्षा बंगल्यातून खाजगी वाहनाने बाहेर पडले. ज्यामुळे या बैठकीतील निर्णयाबद्दल तर्कवितर्क सुरू आहेत.
सध्या मुंबईत सुरु असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली आहे. अहमदपूर तालुक्यातील टाकळगाव येथील ३२ वर्षीय विजय घोगरे या तरुणाचा मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेबद्दल मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी विजयच्या पत्नीला चांगली नोकरी मिळवून देण्याचे आणि मराठा समाजाकडून आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मराठा सेवक संघटनेने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवर आंदोलकांसाठी आचारसंहितेचे बॅनर लावले आहेत. यावर शांततेने आंदोलन करणे, मौल्यवान वस्तू न आणणे आणि जरांगे पाटलांच्या भोवती गर्दी न करण्यासारख्या १३ ते १४ सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी मीरा भाईंदरमधील अझीम तांबोळी या मुस्लिम तरुणाने अजमेर शरीफ दर्ग्यात जाऊन प्रार्थना केली. धर्म वेगळा असला तरी न्यायासाठी लढा एकच आहे, असा संदेश देत त्यांनी सामाजिक एकतेचे दर्शन घडवले. या सर्व घडामोडी पाहता आज मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.