राज ठाकरेंच्या घराचा पत्ता बदलला, ‘कृष्णकुंज’वरुन मुक्काम हलवला, आता चलो ‘शिवतीर्थ’!

| Updated on: Nov 06, 2021 | 11:24 AM

कृष्णकुंज हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं अगोदरचं निवासस्थान... मात्र त्यांनी कृष्णकुंज या आपल्या घराच्या बाजूलाच आणखी एक नवं घर बांधलं आहे. राज ठाकरे आज म्हणजेच 6 नोव्हेंबर रोजी आपल्या पाच मजली घरात राहायला जाणार आहेत.

राज ठाकरेंच्या घराचा पत्ता बदलला, कृष्णकुंजवरुन मुक्काम हलवला, आता चलो शिवतीर्थ!
राज ठाकरे यांचं नवं घर
Follow us on

मुंबई : सणासुदीच्या काळात सगळेच जण नवं काहीतरी खरेदी करण्याच्या प्रयत्न करत असतात. यंदा दिवाळीचा मुहूर्त साधत मनसे अध्यक्ष राज ठाकरे शुभकार्य करणार आहेत. राज ठाकरे नव्या घरात गृहप्रवेश करणार आहे. त्यांचं अगोदरचं निवासस्थान असलेल्या ‘कृष्णकुंज’ शेजारीच त्यांचं हे नवं घर आहे. ‘शिवतीर्थ’ असं त्यांच्या नव्या घराचं नाव आहे. त्यामुळे आता मनसैनिकांना कोणत्याही कामासाठी ‘शिवतीर्थ’वर यावं लागेल.

कृष्णकुंज हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं अगोदरचं निवासस्थान… मात्र त्यांनी कृष्णकुंज या आपल्या घराच्या बाजूलाच आणखी एक नवं घर बांधलं आहे. राज ठाकरे आज म्हणजेच 6 नोव्हेंबर रोजी आपल्या पाच मजली घरात राहायला जाणार आहेत. हे घर सर्व सोयीसुविधांनी युक्त आहे. भाऊबीजेच्या मुहूर्तावर ते आपल्या नव्या घरात कुटुंबासोबत राहायला जातील.

राज ठाकरेंचा पत्ता आता ‘शिवतीर्थ’

आज सकाळी साडे दहा वाजता राजपुत्र अमित ठाकरे यांच्या हस्ते नव्या घराची पूजा झाली. तसंच शिवतीर्थ या घराच्या पाटीचं अनावरणही अमित ठाकरे यांच्या हस्ते झालं. यानंतर राज ठाकरे यांनी नव्या घराची पाहणी केली. दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरुन त्यांनी बंगल्याखाली जमलेल्या मनसैनिकांना अभिवादन केलं. हिरव्या झब्बा घातलेल्या राज ठाकरे यांच्या चेहऱ्यावर नव्या घरात गेल्याचा आनंद ओसांडून वाहत होता. नव्या घरातल्या गॅलरीत त्यांच्या सोबतीला मनसे नेते नितीन सरदेसाई देखील होते.

कसं असेल राज ठाकरेंचं नवं घर?

‘कृष्णकुंज’शेजारी बांधण्यात आलेल्या या पाच मजली इमारतीत पहिल्या मजल्यावर समिती कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. याच इमारतीतमध्ये आता मनसेचे मुख्य कार्यालय देखील असणार आहे. याच ठिकाणी राज ठाकरे हे आपल्या कार्यकर्त्यांना भेटणार आहेत, तसेच इतर नागरिकांना देखील याच कार्यालयात राज ठाकरे यांची भेट घेता येणार आहे.

इतर मजल्यावर ठाकरे यांच्या कुटुंबीयांच्या निवासाची सोय करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या इमारतीमध्ये सुसज्ज सर्व सोयी सुविधांनी युक्त असे एक भव्य ग्रंथालय देखील उभारण्यात आले आहे. इमारतीचे काम पूर्ण झाले असून, आता दिवळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज ठाकरे आणि कुटुंबीय लवकरच या नव्या घरात गृहप्रवेश करणार आहेत.

आता शिवतीर्थावरुन ‘राज’कारण चालणार

दरम्यान आतापर्यंत कृष्णकुंज हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे प्रमुख केंद्र राहिले आहे. ही वास्तू अनेक महत्त्वपूर्ण राजकीय निर्णयाची साक्षीदार राहिली आहे. मुंबईसह राज्यातील कामगारांना् कोणतीही समस्या असो, त्यांना कृष्णकुंज हे आपल्या हक्काचे ठिकाण  वाटते. समस्या घेऊन कष्णकुंजवर आलेल्या नागरिकांना नेहमीच न्याय देण्याचा प्रयत्न मनसेच्या वतीने करण्यात आला. राजकीय वर्तृळामध्ये कृष्णकुंजला विशेष महत्त्व आहे. आता राज ठाकरे यांनी नव्या घरात प्रवेश केल्यानंतर कार्यकर्त्याची अशीच वर्दळ ठाकरे यांच्या नव्या निवासस्थानी पाहायला मिळणार आहे.

हे ही वाचा :

राज ठाकरे करणार नव्या घरात प्रवेश; ‘असे’ असेल नवे निवासस्थान

शिवसेनेच्या वाघिणीचं जंगी स्वागत, रश्मी ठाकरेंकडून डेलकरांचं औक्षण, मातोश्रीचा खास पाहुणचार

महाराष्ट्राच्या बाहेर शिवसेनेचा पहिल्यांदाच भगवा फडकवला, आता कलाबेन डेलकर म्हणतात….