
यावर्षी मे महिन्यापासून महाराष्ट्रातील राजकारणानं 2022 नंतर मोठं वळण घेतलं. विस्तव ही न जाणारे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मे महिन्यात एकाच मंचावर आले. त्यानंतर त्यांच्यात गाठीभेटी सुरूच आहेत. दोन्ही बंधू सातत्याने एकत्र दिसत आहेत. तर राज ठाकरे हे महाविकास आघाडीसह विरोधकांच्या मोर्चातही दिसले. त्यांनी निवडणूक आयोग आणि मत चोरीविरोधात हिरारीने भूमिका मांडली. त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मनसे महाविकास आघाडीसोबत असेल असा दावा करण्यात येत होता. आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली तेव्हा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी याविषयीची मोठी भूमिका मांडली.
मविआमध्ये राज्यस्तरीय समन्वयक
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीविषयी महाविकास आघाडीने एक मोठा निर्णय घेतला आहे. अर्ज भरण्यापूर्वी अथवा नंतर उमेदवारीवरून मतभेद असोत वा काही मदत असो याविषयी चर्चा करण्यासाठी एक राज्यस्तरीय समन्वयक नेमण्याचं ठरवलं आहे. प्रत्येक पक्ष त्यांचा समन्वयक देईल. या समन्वयकांची एक समिती असेल. जागा वाटपासंदर्भात ही समिती एकत्र बसून निर्णय घेईल. राज्यस्तरावर निर्णय घेण्यासाठी हे पाऊल टाकण्यात आले आहे, याविषयीची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली.
मनसे महाविकास आघाडीत?
मनसे महाविकास आघाडीत येणार का, त्याविषयीच्या चर्चा सुरू आहेत. काँग्रेसची याविषयीची भूमिका काय आहे, महाविकास आघाडीची भूमिका काय आहे असे प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी याविषयीचा कोणताही प्रस्ताव महाविकास आघाडीच्या बैठकीत समोर आला नाही. त्यामुळे मनसेच्या महाविकास आघाडातील समावेशाविषयी कोणतीची चर्चा झाली नसल्याची बाजू मांडली. तर महाविकास आघाडीच्या बैठकीत याविषयीचा निर्णय आम्ही अधोरेखित करू असे म्हणणे सपकाळ यांनी मांडले.
होऊ घातलेल्या नगरपालिका,नगर पंचायतीच्या माध्यमातून एकत्र आलो आहे. यापूर्वी दोन निवडणूका महाविकास आघाडीने एकत्रित लढल्याचे ते म्हणाले. तर आगामी निवडणुकीपूर्वी सर्व घटक पक्षांमध्ये समन्वय राहावा यासाठी आजची निवडणूक झाल्याचे ते म्हणाले. स्थानिक पातळीवर, जिल्हा पातळीवर आणि राज्य स्तरावर कसा समन्वयक राहिल याविषयीची आज चर्चा झाल्याची माहिती हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.
पुन्हा होणार महाविकास आघाडीची बैठक
तर 17 नोव्हेंबरपर्यंत अर्ज छाननी आणि माघारीची प्रक्रिया आहे. तोपर्यंत समन्वय समिती लक्ष ठेऊन असेल तर काही तिढे असतील अथवा काही कुरुबुरी असतील तर त्यावर समाधानकारक तोडगा काढण्यात येणार आहे. त्यासाठी पुन्हा महाविकास आघाडीची बैठक होणार असल्याची माहिती हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली. मित्रपक्ष म्हणून ही वाटचाल सुरुच राहणार असल्याचे ते म्हणाले. तर तिनही पक्षांनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिल्याचेही माहिती त्यांनी दिली.