Amazon vs MNS | ॲमेझॉनला किंमत मोजावी लागेल, राज ठाकरेंना नोटिशीनंतर मनसे आक्रमक

| Updated on: Dec 24, 2020 | 1:37 PM

राज ठाकरेंना नोटीस पाठवण्याची किंमत ॲमेझॉनला मोजावी लागेल, असा इशारा अखिल चित्रे यांनी दिला

Amazon vs MNS | ॲमेझॉनला किंमत मोजावी लागेल, राज ठाकरेंना नोटिशीनंतर मनसे आक्रमक
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अ‍ॅमेझॉनमध्ये (Amazon) पेटलेला वाद चिघळण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना दिंडोशी कोर्टाने नोटीस बजावल्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे. ॲमेझॉनला येत्या काळात नक्कीच याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा मनसे नेते अखिल चित्रे (Akhil Chitre) यांनी दिला. अ‍ॅमेझॉनला महाराष्ट्रात मराठी मान्य नसेल, तर आम्हाला महाराष्ट्रात ॲमेझॉन मान्य नाही, अशी स्पष्ट भूमिका मनसेने घेतली आहे. (MNS Leader Akhil Chitre warns Amazon after notice to Raj Thackeray)

“मूर्ख वकिलांकडून लेटर ड्राफ्ट”

मराठी भाषेवरुन सुरु केलेल्या मोहिमेवरुन अ‍ॅमेझॉनने कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर पाच जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश राज ठाकरेंना देण्यात आले आहेत. “अ‍ॅमेझॉनसारख्या प्रतिष्ठित कंपनीने एका चांगल्या लीगल फर्मला अपॉईंट करणं अपेक्षित होतं. पण एखाद्या मूर्ख वकिलाकडून त्यांनी ते लेटर ड्राफ्ट केलं आहे. त्यांनी जी नोटीस पाठवली आहे, त्याला काहीच अर्थ नाही. त्यांनी राज ठाकरेंना नोटीस पाठवण्याचा जो प्रकार केला आहे, त्याची किंमत नक्कीच ॲमेझॉनला येत्या काळात मोजावी लागणार आहे” असा इशारा अखिल चित्रे यांनी दिला.

“मनसे चोख कायदेशीर उत्तर देईल”

“अखिल चित्रे आणि मनसेच्या सरचिटणीसांना याआधी अशाच प्रकारची नोटीस देण्यात आली होती. परंतु सत्र न्यायालयाने पाठवलेल्या नोटिशीच्या आधारे जी सुनावणी झाली, त्याला चांगला दणका दिला आहे. ते इनजंक्शन ऑर्डर फेटाळून लावलं होतं, तरीही परत कायदेशीर डावपेच करुन आता वेळ काढण्यासाठी पक्षाध्यक्षांना मध्ये आणलं आहे. जी काही त्यांच्या वकिलामार्फत नोटीस देण्यात आलेली आहे, त्याला मनसे येत्या काळात कोर्टात चोख कायदेशीर उत्तर देईल” असा इशारा अखिल चित्रेंनी दिला. (MNS Leader Akhil Chitre warns Amazon after notice to Raj Thackeray)

जर अ‍ॅमेझॉनला महाराष्ट्रात मराठी मान्य नसेल, तर आम्हाला महाराष्ट्रात ॲमेझॉन मान्य नाही, ही मनसेची भूमिका स्पष्ट आहे. ॲमेझॉन ॲप आतापर्यंत हजारो लोकांनी अनइन्स्टॉल केलेला आहे, अद्यापही ती प्रक्रिया सुरु आहे. जर अ‍ॅमेझॉन येत्या काळात लवकर वठणीवर आला नाही, तर महाराष्ट्रात त्यांचा व्यवसाय ठप्प होणार हे शंभर टक्के गृहीत धरावं, असंही मनसेने बजावलं.

मनसे-अ‍ॅमेझॉनमधील वाद काय?

अ‍ॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरु केलेल्या मोहिमे अंतर्गत अ‍ॅमेझॉनविरोधात (Amazon) फलक लावण्यात आले आहेत. यावर ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’ असा मजकूर लिहण्यात आला आहे. वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, माहीम, अंधेरी आणि रेक्लमेशनच्या परिसरातील रस्त्यांवर मनसेचे हे फलक पाहायला मिळत आहेत. मनसेचे नेते अखिल चित्रे यांच्याकडून हे फलक लावण्यात आले होते. यापूर्वी मनसेकडून अ‍ॅमेझॉनच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर पोस्टर झळकावण्यात इशारा देण्यात आला होता. तुम्हाला महाराष्ट्रात आमची भाषा मान्य नाही. मग आम्हाला महाराष्ट्रात तुम्ही मान्य नाही, अशी तंबी मनसेने दिली होती.

संबंधित बातम्या :

Amazon vs MNS | राज ठाकरेंना नोटीस, कोर्टात हजर राहण्याचे आदेश

(MNS Leader Akhil Chitre warns Amazon after notice to Raj Thackeray)