
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मतदारयादी प्रमुखांचा एक भव्य मेळावा मुंबईत सुरु आहे. मुंबईतील गोरेगाव (पूर्व) येथील नेस्को सेंटरमध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या ग्रँड मेळाव्याला मुंबईतील महत्त्वाचे पदाधिकारी, मतदार यादी प्रमुख, गटप्रमुख आणि उपशाखाध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. या मेळाव्यादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. अशाप्रकारे निवडणुका होत असतील तर हा महाराष्ट्रातील देशातील मतदारांचा अपमान आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे काय म्हणाले?
सर्वांना दिवाळीच्या मी शुभेच्छा देतो. आज तसं काही नव्हतं. त्यामुळे हा मेळावा घेण्यात आला. हा तातडीचा मेळावा तुम्हाला सर्वांना बोलवून घेतलं. यावेळीची निवडणूक जेव्हा लागेल तेव्हा आणि जेव्हा आपण ठरवू तेव्हा लागेल. ज्याप्रकारे मतदार यादीत गोंधळ सुरु आहे. हा आताचा गोंधळ नाही. हा गेल्या काही वर्षातील गोंधळ आहे. २०१६, २०१७ ला मी याविरुद्धच आवाज उठवला होता. त्यावेळी पत्रकार परिषदही झाली होती. त्यातील अनेकांना मी काय बोलतो याचं गांभीर्यच समजलं नाही. मग जेव्हा आता प्रत्येकाच्या दरवाज्यावर टक टक व्हायला लागली, तेव्हा निवडणुकीचे काय प्रकार सुरु आहे हे समजलं.
विधानसभा निवडणूक झाली तेव्हा २३२ आमदार निवडून आले. एवढं प्रचंड यश मिळाल्यानंतरही महाराष्ट्रात सन्नाटा होता. कुठेही विजयी मिरवणुका नाहीत. कुठे जल्लोष नाही. मतदार अवाक झाले होते. निवडून आलेलेही आवाक् झाले होते. निवडून आलेल्यांनाही मी कसा निवडून आलो हे समजलं नाही. मग सर्वांनाच निवडणूक कशी होते हे समजलं. कशाप्रकाराचा विजय प्राप्त होतोय, कशाप्रकारचे यश मिळतंय हे स्पष्ट दिसतंय.
अनेक लोक म्हणतात की राज ठाकरेंच्या सभेला गर्दी होते, पण त्याचे मतांमध्ये रुपांतर होत नाही. हे कसं केलं तर मतांमध्ये कसं येईल. तेच सुरु आहे. सर्व राज्यातील स्थानिक पक्षांना संपवणे हेच सुरु आहे. त्यांना मिटवून टाकणे. अशाप्रकारे मतदार याद्या केल्या जात आहेत. आताच्या निवडणुकीत ९६ लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरले आहेत. मुंबईत ८-१० लाख, ठाण्यात ८ लाख, असेच प्रत्येक जिल्ह्यात भरले. आपल्या देशात अशा निवडणुका होणार आहेत का, मग कशाला प्रचार करायचा, कशाला उमेदवार उभा करायचा, कशासाठी निवडणुका लढायचा, कशासाठी मतदारांनी रांगेत उभे राहायचं, अशाप्रकारे निवडणुका होत असतील तर हा महाराष्ट्रातील देशातील मतदारांचा अपमान आहे.