
सध्या महाराष्ट्रात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या धोरणात्मक दिशेवर चर्चा करण्यासाठी आज शिवतीर्थावर महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत मनसेचे प्रवक्ते, नेते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी राज ठाकरेंनी नेत्यांना आगामी काळात पक्ष कसा काम करेल, याबद्दल मार्गदर्शन केले.
या बैठकीनंतर मनसे नेते संदीप देशपांडे आणि बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केलेत. तसेच उद्या मनसे निवडणूक आयोगाची भेट घेणार असल्याचेही संदीप देशपांडे यांनी सांगितले. निवडणूक आयोगाकडे उद्या शिष्टमंडळ जाणार आहे. त्यामध्ये मनसे, ठाकरे, भाजप, शिवसेना शिंदे गट, अजित पवार राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या सर्वांना पत्र पाठवलेला आहे. निवडणुकीच्या नियमावली मध्ये चुका दुरुस्ती संदर्भात हे पत्र आहे. यामध्ये महाविकासआघाडीचा काही संबंध नाही. निवडणूक आयोगाकडे शिष्टमंडळ जाणार तेवढ्यापुरताच हे मर्यादित आहे, असे स्पष्टीकरण संदीप देशपांडे यांनी दिले.
तसेच बाळा नांदगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुका पारदर्शक व्हाव्यात आणि लोकांचा संभ्रम दूर व्हावा यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ निवडणूक आयोगाकडे जावे, यासाठी मनसे प्रयत्नशील होती. यासाठी मनसे, ठाकरे गट, भाजप, शिंदे गट, अजित पवार राष्ट्रवादी आणि शरद पवार राष्ट्रवादी या सर्व प्रमुख पक्षांना लेखी निमंत्रण पाठवण्यात आले आहे. उद्याची बैठक फक्त निवडणुका पारदर्शकतेने व्हावी यासाठी आम्ही एकत्र येतोय, एवढाच प्रश्न आहे. यामध्ये महाविकास आघाडीचा काही संबंध नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच यावेळी संदीप देशपांडे यांनी काँग्रेससोबत जाण्याच्या भूमिबद्दलही स्पष्टीकरण दिले. आम्ही काँग्रेसकडे कोणताही प्रस्ताव पाठवला नाही. त्यामुळे त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही. आमच्या पक्षाची भूमिका राज ठाकरे ठरवतात. तेच मांडतात. आमचे प्रवक्ते मांडतात. बाकी कोण मांडत नाही. यापुढेही आमच्या पक्षाची भूमिका आम्हीच मांडणार आहोत. त्यामुळे काँग्रेससोबतच्या भूमिकेबाबत राज ठाकरे योग्य वेळी निर्णय घेऊन माहिती देतील, असं संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले.
तसेच छटपूजा करण्याला मनसेचा विरोध नाही, मात्र त्यामागे राजकीय ताकद दाखवण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला विरोध होईल. ही राज ठाकरे यांची भूमिका असल्याचे संदीप देशपांड यांनी म्हटले. ठाण्यात स्थानिक प्रशासनाच्या अनास्थेविरोधातील मोर्चावर बोलताना, जनतेच्या प्रश्नांसाठी सगळे एकत्र येत असतील आणि सिस्टीम चांगली व्हावी ही भूमिका सर्वांचीच असेल तर ते चांगली गोष्ट आहे, असेही संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले.