
आगामी महापालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे आता राजकारणात विविध घडामोडी घडताना दिसत आहेत. एकीकडे अनेक पक्षातील नेते हे भाषण विविध घोषणाबाजी करण्यात व्यस्त असताना दुसरीकडे ठाकरे बंधूंमधील जिव्हाळा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज पुन्हा शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी दाखल झाले आहेत. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे आज दुपारी १२.३० च्या सुमारास शिवतीर्थ या निवासस्थानावरुन मातोश्रीकडे रवाना झाले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची ही भेट कौटुंबिक स्वरूपाची असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या दोन महिन्यात सलग सातव्यांदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट होत आहे. ठाकरे बंधूंमध्ये वाढलेल्या सलोख्यानंतर आता मातोश्रीवर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच निमित्ताने राज ठाकरे हे मातोश्रीवर गेल्याचे पाहायला मिळत आहे.
विशेष म्हणजे यावेळी राज ठाकरेंसोबत एक खास व्यक्तीही पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यावेळी पहिल्यांदाच अत्यंत खास व्यक्तीसोबत मातोश्रीवर दाखल झाले आहे. राज ठाकरे यांनी त्यांच्या आईसोबत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. मी माझ्या कुटुंबासोबत आलो आहे. माझी आई माझ्यासोबत आहे. ही कौटुंबिक भेट आहे,’ अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी मातोश्रीवर दाखल झाल्यानंतर दिली. मात्र या स्नेहभोजनाच्या निमित्ताने दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये विविध राजकीय विषयांवर गंभीर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीमध्ये आगामी मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका याबद्दल चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. तसेच भाजप आणि सध्याच्या सत्ताधारी युतीविरोधात एकी साधण्यासाठी दोन्ही भाऊ एकत्र येणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. जर दोन्ही ठाकरे एकत्र आले तर मराठी मतांचे विभाजन टळेल आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो, असा अंदाज राजकीय तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे.
राज ठाकरे यांच्या मातोश्रीवर वाढलेल्या फेऱ्यांमुळे सध्या मनसे आणि ठाकरे गट हे एकत्र येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. गेल्या दोन महिन्यांत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची सलग सात वेळा भेट झाली आहे. त्यामुळे ही भेट फक्त कौटुंबिक मर्यादेपुरती आहे का? की यातून महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकारणाला नवी दिशा मिळणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.