अयोध्येला जाताना हे लक्षात ठेवा, संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे (Sandeep Deshpande slams CM Uddhav Thackeray).

अयोध्येला जाताना हे लक्षात ठेवा, संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
संदीप देशपांडे, मनसे
| Updated on: Mar 06, 2020 | 9:24 AM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे. अयोध्या दौऱ्यावर जाण्याअगोदर अयोध्येचा इतिहास लक्षात ठेवा, असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे (Sandeep Deshpande slams CM Uddhav Thackeray).

महाविकास आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाण्याअगोदरच संदीप देशपांडे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर टीका केली आहे.

“लक्षात ठेवा, प्रभू रामचंद्रांनी वडिलांच्या सांगण्यावरुन सत्तेला लाथ मारुन चौदा वर्ष वनवास भोगला आणि भरताला राज्य दिले. पण भरताने संधीसाधूपणा न करता रामचंद्रांच्या पादुका ठेवून राज्य केले. असा इतिहास असलेल्या अयोध्येला जाताय तेव्हा जाताना जनाची नाही किमान मनाची तरी… शुभेच्छा”, असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.

कसा असेल उद्धव ठाकरेंचा दौरा?

उद्धव ठाकरे शनिवार सात मार्चला दुपारी अयोध्येत श्रीरामलल्लांचे दर्शन घेतील. संध्याकाळी शरयू नदीच्या तीरावर आरती करतील, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. उद्धव ठाकरेंसोबत शिवसेनेचे सर्व मंत्री, खासदार, आमदार, नेते आणि कार्यकर्तेही अयोध्येला जाणार आहेत. (Sanjay Raut meets Yogi Adityanath)

उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी शिवसैनिक अयोध्येला रवाना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारी म्हणजे उद्या (7 मार्च) अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी शिवसैनिक अयोध्येला रवाना झाले आहेत. शिवसैनिकांची काल (5 मार्च) 18 डब्यांची विशेष रेल्वे अयोध्येला रवाना झाली. या दौऱ्यासाठी मुंबई आणि उपनगरातील शिवसैनिकांसाठी 18 डब्यांची विशेष रेल्वे आरक्षित करण्यात आली होती. काल दुपारी 2 वाजता ही रेल्वे मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटली. ही गाडी आज संध्याकाळपर्यंत अयोध्येत पोहोचेल. शनिवारी रात्र 11.30 वाजता या गाडीचा परतीचा प्रवास सुरु होणार आहे.

संबंधित बातमी : मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत आदित्यनाथांशी मैत्रीपूर्ण चर्चा : संजय राऊत