आंदोलन म्हणजे देशद्रोह नाही, GenZ ने आंदोलन करू नये असं म्हणणार नाही, पण… मोहन भागवत यांचं मोठं विधान काय?

मोहन भागवत यांनी Gen Z च्या आंदोलनावर मोठे विधान केले. 'आंदोलन म्हणजे देशद्रोह नाही', असे सांगत त्यांनी Gen Z ला संविधानानुसार आंदोलन करण्याचा सल्ला दिला. शिक्षण हा व्यवसाय नसून तो सर्वांना सुलभ असावा, असेही ते म्हणाले. लोकशाहीत संवाद महत्त्वाचा असून, शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा आंदोलनाशिवायही शक्य आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आंदोलन म्हणजे देशद्रोह नाही, GenZ ने आंदोलन करू नये असं म्हणणार नाही, पण... मोहन भागवत यांचं मोठं विधान काय?
Mohan Bhagwat
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 06, 2026 | 7:07 PM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज जेनजीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जेनजींच्या स्वभाव आणि मनोदशेवर प्रकाश टाकला. जेनजींबाबत बोलायचं झालं तर शिक्षण क्षेत्रात अनेक गोष्टी करायच्या आहेत. त्या होत नसल्याने आंदोलन झालं. संवाद तर व्हायलाच हवा. आमची पिढी मोठे सांगायचे तेच ऐकायची. आम्ही कधीच मोठ्यांना उलटा सवाल केला नाही. आताची पिढी प्रश्नाला उत्तर मागते. त्यांना लॉजिकल उत्तर हवे आहे. आणि प्रेमही हवे आहे, असं मोहन भागवत म्हणाले. तसेच जेनजीने आंदोलन करू नये असं मी म्हणणार नाही. पण ते कसं करायला हवं हे संविधानात लिहिलं आहे, असंही त्यांनी म्हटलं.

आंदोलन सुद्धा संवादाचा एक प्रकार आहे. आपण बसलोय, बोलतोय, आपण चर्चा करू. प्रश्न सुटला नाही तर मी आरडाओरडा करेल. लोकशाहीमध्ये आंदोलन सुद्धा एक प्रकार आहे. लोकशाहीमध्ये पूर्वपक्ष आणि उत्तर पक्ष असतो. प्रत्येकजण आपापल्या दृष्टीने पाहतो. जेनजीने आंदोलन करू नये असे मी बोलणार नाही. पण ते कसे करायला हवे याबाबत बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले आहे, त्यात माहिती आहे. आंदोलन यंत्रणा सुधारण्यासाठी हवी. आपल्या किंवा तुमच्या विरोधात नसावे. जे नको व्हायला ते झाले तर चूक होते. तेव्हा हे होते. चुकीची कुणाची आहे हे नंतर येते. पण संवाद तर हवाच, असं मोहन भागवत यांनी सांगितलं.

आंदोलन म्हणजे देशद्रोह नाही

आंदोलन म्हणजे देशद्रोह नाही. ते आपले लोक आहेत. त्यांना आपलेपणा हवा आहे. मला वाटतं नवी पिढी जेनजी आणि अल्फा अधिक प्रामाणिक आहे. देशभक्तीसाठी हा प्रामाणिकपणा जास्त हवा आहे, असं सांगतानाच जंतरमंतरवर लाठीचार्ज का झाला याची माहिती माझ्याकडे नाही. पण ते पाहून कुठे गडबड झाली हे पाहावे लागेल. आपल्याला हे माहिती नाही. आपण बातम्या वाचून बोलत आहोत. मी डोळे झाकून जेनजीवर विश्वास ठेवेल, असं मोहन भागवत म्हणाले.

शिक्षण म्हणजे बिझनेस नाही

15 लाख पैकी 1 लाख शाळांमध्ये टॉयलेट नाही, मग मुलगी शिकणार कशी? 15 हजार शाळांमध्ये पिण्याचे पाणी नाही ही राष्ट्रीय आणीबाणी आहे का? असा सवाल भागवत यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी उत्तर दिलं. शिक्षण हा कमर्शियल बिझनेस नाही. शिक्षण सर्वांना सुलभ असावे, असे स्ट्रक्चर करावे लागेल. आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे. ज्याची जबाबदारी आहे त्याने हे ठिक करावे. कार्यकर्ते आणि लोकांनी मिळून अनेक गावांमध्ये चांगल्या शाळ्या केल्या आहेत. शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी आपल्याला सहभागी व्हावे लागेल. शिक्षकांनाही प्रशिक्षण द्यावे लागेल. पण बेसिक म्हणजे शिक्षण हे पुढची पिढी तयार करण्यासाठी देत आहोत, पैसे कमाविण्यासाठी नव्हे, असं सांगतानाच तुम्ही पण एक प्रकल्प घेऊन या, ज्यामध्ये समाजाला ठीक करता येईल. तर आणखी एक प्रयत्न होईल, असं त्यांनी म्हटलं.

आंदोलनाशिवाय होऊ शकते

आपल्याकडे 10 लाख शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षण पद्धतीसाठी समिती तयार होते, पण काम होत नाही, याकडे भागवत यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. 6 टक्के निधीची मागणी आम्ही सुद्धा करतो. ही मागणी योग्य आहे. त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. त्यासाठी सरकारने पूर्ण शिक्षण व्यवस्था चालवण्याची गरज नाही. बजेटच्या भरवशावर नाही चालत. स्पिरिट जागवण्याची गरज आहे. आंदोलनाशिवायही हे होऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us