नको ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल, मुंबईतील तरुणीने संपवलं आयुष्य

Mumbai Crime : मुंबईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीने एका तरूणीला मॉर्फ केलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केले, यातून नैराश्येत गेलेल्या तरूणीने जीवन संपवल्याचे समोर आले आहे.

नको ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल, मुंबईतील तरुणीने संपवलं आयुष्य
Mumbai Crime
Image Credit source: TV 9 Marathi
Updated on: Nov 26, 2025 | 6:33 PM

मुंबईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तरूणीने एका व्यक्तीच्या त्रासामुळे आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे. आरोपी व्यक्तीने तरुणीला तिचे मॉर्फ केलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केले होते. बदनामीच्या भीतीने या महिलेने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संजयराज विश्वकर्मा या व्यक्तीला आता अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

तरूणी आरोपीच्या संपर्कात होती

समोर आलेल्या माहितीनुसार गोरेगावमध्ये राहणारी एक तरूणी आरोपीच्या सतत संपर्कात होती. हे दोघे व्हॉट्सअॅप आणि फोन कॉलवर तासनतास बोलायचे. मात्र कालांतराने आरोपीने तरूणीला त्रास देण्यास सुरुवात केली. ही माहिती तरूणीच्या पालकांना कळताच त्यांनी तिला आरोपीपासून दूर राहण्यास सांगितले, मात्र ती तरीही त्याच्या संपर्कात होती अशी माहिती समोर आली आहे.

आरोपीने ब्लॅकमेल कसे केले?

आत्महत्या केलेल्या तरूणीच्या आईने सांगितले की, आरोपी संजयराज विश्वकर्मा माझ्या मुलीला एका मित्राच्या कार्यक्रमात घेऊन गेला होता. त्या कार्यक्रमात त्याने तिचे अनेक फोटो काढले होते. नंतर त्याने या फोटोंचा वापर करत अश्लील फोटो तयार केले आणि पैशासाठी तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्याने तिच्याकडून अनेकदा पैसे उकळले, त्यानंतरही आरोपी तिला धमकावत होता.

ब्लॅकमेलिंगमुळे तरूणी नैराश्यात

समोर आलेल्या माहितीनुसार, संजयराज विश्वकर्मा करत असलेल्या ब्लॅकमेलिंगमुळे गेल्या काही आठवड्यांपासून पीडित तरूणी मानसिक ताणतणावात होती. सततच्या मानसिक छळामुळे ती अधिक नैराश्यात गेली होती. यातून तिने 15 नोव्हेंबर रोजी राहत्या घरी छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.

आरोपीविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल

तरूणीच्या आत्महत्येनंतर तिच्या पालकांनी गोरेगाव पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर आता त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात अश्लील फोटो प्रसारित करण्याची धमकी देणे, ब्लॅकमेल करणे, खंडणी मागणे आणि आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलीस याबाबत अधिकचा तपास करत आहेत.