VIDEO: साहेब, हातजोडून विनंती आहे सातवा वेतन आयोग लागू करा, नाही तर आज 37 गेले, उद्या 370 होतील; एसटी कामगारांचा ‘कृष्णकुंज’वर टाहो

| Updated on: Nov 11, 2021 | 1:29 PM

साहेब, तुम्हाला हातजोडून विनंती आहे... आम्हाला सातवा वेतन आयोग लागू करा. मग विलिनीकरणाची प्रक्रिया सुरूच राहिल. पण आता वेतन आयोग लागू झाला नाही. (msrtc employees discuss with mns chief raj thackeray)

VIDEO: साहेब, हातजोडून विनंती आहे सातवा वेतन आयोग लागू करा, नाही तर आज 37 गेले, उद्या 370 होतील; एसटी कामगारांचा कृष्णकुंजवर टाहो
raj thackeray
Follow us on

मुंबई: साहेब, तुम्हाला हातजोडून विनंती आहे… आम्हाला सातवा वेतन आयोग लागू करा. मग विलिनीकरणाची प्रक्रिया सुरूच राहिल. पण आता वेतन आयोग लागू झाला नाही. पगार वाढला नाही तर आज 37 कामगार गेले. उद्या हा आकडा 370 होईल. त्यामुळे साहेब, तुम्हीच या प्रकरणात लक्ष घाला. तुम्हीच आमचे तारणहार आहात, असा आर्त टाहो एसटी कामगारांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसमोर फोडला.

एसटी कामगारांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी एसटी कामगारांनी त्यांच्या व्यथा राज यांच्यासमोर पोटतिडकीने मांडल्या. एक हजार लोकांना निलंबनाच्या नोटीस आल्या आहेत. 12 दिवसानंतर त्यांच्या कारवाया सुरू झाल्या आहेत. विलिनीकरण करायचं म्हणजे त्यात दोन पार्ट येणार. राज्य सराकरच्या ड्रायव्हरला जो पगार आहे. तोच आमच्या ड्रायव्हरला पगार मिळेल. एवढं साधं सोप्पं गणित आहे. आता आमच्या पगारावर तीनशे कोटी रुपये खर्च होतात. विलनीकरण केल्यानंतर सातवा वेतन आयोग लागू होईल. त्यामुळे त्याचा बोजा साडे तीनशे कोटी ऐवजी एक हजार कोटी होईल, असं या कामगारांनी सांगितलं.

महाराष्ट्र घडवण्यात आमचाही वाटा आहे ना?

70 वर्ष आम्ही महाराष्ट्राची सेवा करतोय. महाराष्ट्र घडवण्यात आमचाही वाटा आहे ना? प्रत्येकवेळी आमच्यासाठी पैसे कसे नसतात? अर्थसंकल्पात तरतूद करा. आत्महत्या थांबतील असा मी तुम्हाला आज शब्द देईल. पण विलनीकरणाची समिती बनली आणि हातात काही आलं नाही तर 12 दिवस आंदोलन केल्यानंतर बायकोला सांगायचं काय? 12 दिवस संपात बसलो पगार वाढणार आहे का नाही? मग कशाला बसला 12 दिवस संपात? असा सवाल आम्हाला घरातून विचारला जाईल. ही माझी पोटतिडीक आहे. मला बोलू द्या एक लाख कामगारांचा प्रतिनिधी आणि कामगार म्हणून मी बोलतोय. आता पगार नाही वाढला तर मला सांगा काय आवस्था होईल आमची. समित्या होतील. कोर्ट कचेरी होईल… पुढे काय? असा सवाल कामगारांनी केला.

हवं तर महिना घ्या, पण आयोग लागू करा

करार पद्धतीने सर्व दिल्याचं सरकार म्हणते. करार चुकीचे झाले म्हणून आमची ही अवस्था झाली. करार चांगले झाले असते तर ही अवस्था झाली नसती. आता आमची हातजोडून विनंती आहे साहेब आयोग लागू करा. तुमचं विलनीकरण कवा होऊ द्याचं ते होऊ द्या. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला पगार द्या. तुम्ही तीन आठवडे मागता ना आणखी एक महिना घ्या. हिवाळी अधिवेशनात विषय मांडा आणि तरतूद करा. कायदा झाल्याशिवाय आम्हाला काहीच मिळणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

तुम्हीच महाराष्ट्राचे तारणहार

तुम्ही दोघं बसा आणि निर्णय घ्या… आम्हाला सांगा… अन् पुढची तारीख… असंच सुरू आहे. आम्ही रस्त्यावर बसायचं का? असा सवाल करतानाच या प्रकरणाचं कुणाला काही पडलं नाहीय. तुम्हीच महाराष्ट्राचे तारणहार आहात हे माझं मत आहे. एक मागणं आहे. माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी काही मागत नाही. एक लाख कुटुंबासाठी मागत आहे. काहीच मिळालं नाही तर आज 37 आहेत. उद्या 370चा आकडा असेल. हे मी आज तुम्हाला सांगतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्राने दिवाळी केली, आम्ही गेटवर होतो

आमची दिवाळी झाली नाही. घरात पगार नाही. दिवाळीचा फराळ बनवला गेला नाही. बायको, लेकराला कपडे घेऊ शकलो नाही. फटाके विकत घेऊ शकलो नाही. महाराष्ट्राने दिवाळी साजरी केली. एसटीचा कर्मचारी गेटवर बसून होता. तुम्हाला हात जोडून विनंती आहे. पाया पडतो पण हा प्रश्न मिटवा. नोव्हेंबर आणि डिसेंबरचा पगार आयोगानुसार करा. विलनिकरण नंतर होणारच आहे, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

आधी अमृता यांच्याशी पंगा, आता देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस, मलिकांच्या लेकीने शड्डू ठोकला!

VIDEO: आत्महत्या करणाऱ्यांचं नेतृत्व करणार नाही, आधी आत्महत्या थांबवा; राज ठाकरेंचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

गुजरातेतल्या द्वारकेत 350 कोटींचं ड्रग्ज पकडलं, आधी संजय राऊत, आता मलिकांनी भाजपला घेरलं?

(msrtc employees discuss with mns chief raj thackeray )