मुंबई महापालिकेत मनसे आणि ठाकरेंची युती होणार, फॉर्म्युला ठरला, मनसेला किती जागा?
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांच्या संभाव्य युतीची जोरदार चर्चा सुरू आहे. ठाकरे गटाने मनसेला ७० जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे.

राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी येत्या २ डिसेंबरला मतदान होणार आहे. तर ३ डिसेंबरला लगेचच मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. त्यातच आता शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या संभाव्य युतीबद्दलची चर्चा आता अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे बोललं जात आहे. या युतीमुळे मुंबईच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाकडून मनसेला ७० जागांचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही पक्षांनी मुंबई महानगरपालिकेत एकत्र निवडणूक लढवल्यास भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेसमोर मोठे आव्हान उभे राहील, असा अंदाज वर्तवला जात आहे. या संभाव्य युतीवर मनसे नेते अमित ठाकरे यांनीही एक मोठे विधान केले आहे.
ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चांना बळ
अमित ठाकरे यांना नुकतंच ठाकरे बंधू एकत्र आल्याने भीती दाखवली जाते का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्ट उत्तर दिले. दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची भीती मुंबई महापालिकेत दिसेल, असे अमित ठाकरे म्हणाले. अमित ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चांना बळ मिळाले आहे. तसेच येत्या महापालिका निवडणुकीत ही युती प्रत्यक्षात येणार असून त्याचा थेट परिणाम निवडणुकीच्या निकालात दिसेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
दरम्यान मुंबई महापालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका मानली जाते. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ या महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. मात्र आता राज्यात झालेल्या मोठ्या राजकीय उलथापालथीमुळे शिवसेनेमध्ये फूट पडली आहे. या फुटीनंतर आता ठाकरे गट आणि मनसे एकत्र येऊन पुन्हा एकदा मराठी मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करतील, अशी शक्यता आहे.
महायुतीला निवडणुकीची रणनीती बदलावी लागणार
ठाकरे गट आणि मनसेच्या युतीमुळे भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना महायुतीवर मोठा दबाव पडेल असे म्हटलं जात आहे. भाजपने मुंबई महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी शिंदे गटाची साथ महत्त्वाची मानली जात होती. मात्र आता दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास महायुतीला आपली निवडणुकीची रणनीती बदलावी लागू शकते. त्यामुळे मुंबईत ठाकरे विरुद्ध महायुती अशी थेट लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
