शिवसेना मनसेसोबत जाणार का? काँग्रेस नेत्याचे मोठे विधान, म्हणाले मुंबई महापौरपद…

काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपवर जोरदार टीका केली. मुंबईचा पुढील महापौर काँग्रेसचाच असेल, असा ठाम दावा त्यांनी केला.

शिवसेना मनसेसोबत जाणार का? काँग्रेस नेत्याचे मोठे विधान, म्हणाले मुंबई महापौरपद...
uddhav thackeray raj thackeray bmc
| Updated on: Nov 07, 2025 | 4:23 PM

आगामी महापालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोमाने काम करत आहेत. काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपवर जोरदार टीका केली. तसेच मुंबईच्या महापौराबाबत मोठा दावा केला आहे. यावेळी त्यांनी मतदार याद्यांमधील गोंधळ, वंदे मातरम वाद आणि मुंबईकरांच्या समस्या यावरही सडेतोड उत्तरे दिले.

अस्लम शेख यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अस्लम शेख यांनी काँग्रेसचा महापौर बसवण्याचा ठाम दावा केला आहे. मुंबईचा पुढील महापौर काँग्रेसचाच असेल आणि मुंबईकरांच्या समस्या सोडवणे हे त्यांचे प्रथम प्राधान्य असेल, असे अस्लम शेख म्हणाले.

पहिला निर्णय मुंबईतील वाहतूक समस्या सोडवणे

मुंबईचा महापौर काँग्रेसचाच असणार आहे. भाजपने महापौरपदाची चिंता करण्याऐवजी मुंबईसाठी काय करणार, हे सांगावे. आमचा महापौर झाल्यानतंरचा पहिला निर्णय मुंबईतील वाहतूक समस्या सोडवण्याचा असेल, ज्यामुळे लोकांचे जीव वाचतील. याशिवाय, आरोग्य व्यवस्था सुधारणे आणि तरुणांसाठी खेळण्याच्या जागा उपलब्ध करणे महत्त्वाचे आहे, यावरही लक्ष केंद्र करु, असे अस्लम शेख यांनी म्हटले.

तसेच अस्लम शेख यांनी शिवसेना आणि मनसेसोबतच्या युतीवरही भाष्य केले. अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते स्थानिक निवडणुका स्वबळावर लढवण्याची मागणी करत आहेत. पण शिवसेना आणि मनसेसोबत युती करायची की नाही, हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते म्हणजेच हायकमांड) ठरवतील, असे अस्लम शेख म्हणाले.

इलेक्शन कमिशन झोपले आहे का?

यावेळी अस्लम शेख यांनी मतदार याद्यांमधील मोठ्या चुकांवरून निवडणूक आयोगावर (EC) थेट प्रश्नचिन्ह उभे केले. राहुल गांधी आणि मी स्वतः सुरुवातीपासूनच याद्या चुकीच्या असल्याचे सांगत आहोत. मालाडमध्ये १७ हजार डुप्लिकेट नावे आढळल्याचे आशिष शेलार यांनीही मान्य केले होते. इलेक्शन कमिशन झोपले आहे का? एकाच व्यक्तीचे तीन-तीन नावे आणि परदेशी लोकांची नावे याद्यांमध्ये येणे, ही सिस्टम लेव्हलवरची मोठी चूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांच्या मतदारसंघांतही चुका आहेत. भाजपने प्रेस कॉन्फरन्स करण्याऐवजी या चुका दुरुस्त कराव्यात, अशी मागणी अस्लम शेख यांनी केली.

गेल्या दोन वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेच्या निधीचा गैरवापर झाला आहे. या सरकारमध्ये बसून भ्रष्टाचार केला गेला आहे, असा थेट आरोप त्यांनी केला. तुम्ही त्यांची चिंता करू नका, महापौर आमचाच बसणार. फक्त तुम्ही सांगा की मुंबईसाठी काय करणार आहात, असेही अस्लम शेख म्हणाले.