Mumbai Manhole Mishap : मॅनहोलमध्ये पडून मुंबईकराचा मृत्यू, उपमहापौरांचा BMC कमिश्नर अश्विनी भिडे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप
Mumbai Manhole Mishap : मुंबईत सध्या मुसळधार पाऊस पडतोय. आज मुंबईच्या साकीनाका परिसरात रस्त्यावरुन चालणाऱ्या एका व्यक्तीचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला. मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी या दुर्घटनेची सर्व जबाबदारी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्यावर टाकली आहे.

मुंबईत मागच्या दोन-चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे दुर्घटना सुद्धा घडू लागल्या आहेत. तीन दिवसांपूर्वी चेंबूरमध्ये एका शाळेच्या बसवर झाड कोसळलं होतं. त्यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. आज मुंबईच्या साकीनाका परिसरात दुसरी दुर्घटना घडली. रस्त्यावरुन चालणाऱ्या एका व्यक्तीचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला. शिवसेना नगरसेवक आणि मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी या दुर्घटनेसाठी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना जबाबदार धरलं आहे. अस्लम शेख असं मृत व्यक्तीचं नाव असल्याचं त्यांनी सांगितलं. ते मोबाइल फोनवर बोलत असताना सकाळी 11 च्या सुमारास ही घटना घडली असं संजय घाडी म्हणाले.
या घटनेसाठी मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे जबाबदार असल्याचा मी आरोप करतो असं मुंबईचे उपमहापौर संजय घाडी म्हणाले.”चार-पाच दिवसांपूर्वी मी आयुक्त मॅडमना पत्र दिलं होतं. प्रेसला सुद्धा दिलं होतं. पण तुम्ही प्रसिद्धी केली नाही. पुराव्यासकट मी सांगितलेलं, वॉर्ड स्तरावर मॅन होल्ससाठी काढलेले कॉन्ट्रॅक्ट आहेत, त्याची मुदत संपलेली आहे. संरक्षित जाळ्या लावल्या गेलेल्या नाहीत. आपण त्याची चौकशी करुन आदेश द्यावेत अशी मी मागणी केलेली” असं संजय घाडी म्हणाले.
आयुक्त मॅडम अजून किती बळी घेणार
“परवाच मॅडमना भेटलो, त्यावेळी सुद्धा आठवण करुन दिली. पण त्यांनी ढम्म प्रतिक्रिया दिली. आयुक्तांनी याची जबाबदारी घ्यावी अशी मी मागणी करतो” असं संजय घाडी म्हणाले. “आम्ही आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या कानावर ही गोष्ट घालू. त्यांचा मला फोन आलेला मुंबईकरांना आपण मदत केली पाहिजे. मला या घटनेबद्दल समजल्यानंतर अर्ध्या रस्त्यातून इथे आलो. आयुक्त आणि त्यांच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. आयुक्त मॅडम अजून किती बळी घेणार आणि त्याची जबाबदारी आमच्यावर टाकणार” असं संजय घाडी म्हणाले. आम्ही लोकप्रतिनिधी असोल, तरी अधिकाऱ्यांना सर्तक करण्याचं काम करत असं संजय घाडी म्हणाले.