मोठी बातमी: मुंबईत मुसळधार पाऊस, ट्रॅकवर पाणी साचल्याने मध्य आणि हार्बर रेल्वे वाहतूक ठप्प

| Updated on: Jun 09, 2021 | 10:44 AM

खबरदारीचा उपाय म्हणून 9 वाजून 50 मिनिटांनी या मार्गावरील रेल्वेसेवा थांबवण्यात आली. ट्रॅकवरील पाणी ओसरल्यानंतर ही रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्यात येईल, असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. | Mumbai Rain local train

मोठी बातमी: मुंबईत मुसळधार पाऊस, ट्रॅकवर पाणी साचल्याने मध्य आणि हार्बर रेल्वे वाहतूक ठप्प
Follow us on

मुंबई: मुंबईत सकाळपासून पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. राज्यातील लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यानंतर लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली होती. मात्र, आज पहिल्याच पावसात कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे (Local Train) ठप्प झाल्याने गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.

मध्य रेल्वेने ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. सकाळपासून पाऊस पडत असल्याने कुर्ला आणि सीएसएमटी या रेल्वे स्थानकांदरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून 9 वाजून 50 मिनिटांनी अप मार्गावरील रेल्वेसेवा थांबवण्यात आली. ट्रॅकवरील पाणी ओसरल्यानंतर ही रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्यात येईल, असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. (Railway tracks submerged between Sion railway station & GTB Nagar railway station due to heavy rainfall in Mumbai)


मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, सखल भागांमध्ये साचले पाणी

हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे मुंबई आणि उपनगर परिसरात बुधवारी सकाळपासून मुसळधार पावसाला (Rain) सुरुवात झाली आहे. गेल्या दोन ते तीन तासांपासून पाऊस सुरु आहे. त्यामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये नेहमीच्या प्रथेप्रमाणे पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. कामावर जाण्यासाठी निघालेल्या लोकांची या पाण्यातून वाट काढताना त्रेधातिरपीट उडताना दिसत आहे.

सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणे अवघड झाले आहे. परिणामी या भागात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. थोड्याचवेळात समुद्रालाही मोठी भरती येणार आहे. या काळात पाऊस असाच सुरु राहिल्यास या भागांमध्ये आणखी पाणी तुंबण्याची शक्यता आहे.

राज्यात पुढचे 4 दिवस धुवाँधार पावसाचा अंदाज

हवामान विभागाकडून मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 4 दिवस हे मुंबईसाठी धोक्याचे असणार आहे. या काळात 300 मिलिमीटहून जास्त पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

संबंधित बातम्या 

हवामान विभागाकडून चार दिवस अतिवृष्टीचा इशारा, ठाण्यात यंत्रणा सज्ज, आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना

मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा; यंत्रणांना सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Weather Alert: विदर्भातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ दिवशी मान्सूनचं आगमन होणार

(Railway tracks submerged between Sion railway station & GTB Nagar railway station due to heavy rainfall in Mumbai)