
आज ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण आहे. यानिमित्ताने राज्यात ठिकठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुंबईतही अनेक कार्यालयांमध्ये, शाळांमध्ये तसेच अनेक शासकीय आस्थापनांमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. मात्र आज सकाळी मुंबई लोकल विस्कळीत झाल्याने प्रवाशी संतप्त झाले आहेत. मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गांवरील रेल्वे वाहतूक ही विस्कळीत झाली आहे. यामुळे पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेवरुन प्रवास करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. कर्नाक पुलावर गर्डर लाँचिंगसाठी घेतलेला ब्लॉक अद्याप रद्द न झाल्याने ही रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.
मुंबईत कर्नाक पुलावर गर्डर बसवण्यासाठी दोन दिवस रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आला होता. मात्र हे गर्डर लॉचिंगचे काम अद्याप संपलेले नाही. त्यामुळे रेल्वेच्या तिन्हीही मार्गावरील वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आहे. मध्य रेल्वे मार्गावरून सीएसएमटीपर्यंत जाणाऱ्या काही लोकल परळपर्यंतच थांबवण्यात आल्या आहेत. तर पश्चिम रेल्वेवरील गाड़्या या अंधेरीपर्यंत धावत आहेत. तसेच हार्बर रेल्वेवरील गाड्या या फक्त वडाळा स्थानकापर्यंत सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गांची सेवा खोळंबलेली असल्याने प्रवाशांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. कामावर निघालेल्या लोकांना अथवा प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदनासाठी जाणाऱ्या शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना इच्छित ठिकाणी पोहोचायला उशीर होत आहे.
हार्बर मार्गावर जीटीबी ते वडाळा दरम्यान गेल्या अर्धा तासांपासून सिग्नल न मिळाल्याने एक लोकल उभी आहे. कोणार्क ब्रिजचे काम सुरू आहे, अशी घोषणा सातत्याने वडाळा रेल्वे स्थानकात केली जात आहे. त्यामुळे लोकल या फक्त वडाळ्यापर्यंतच चालविल्या जातील, असे सांगण्यात येत आहे. मात्र यामुळे प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण कार्यक्रमास पोहोचणे कठीण झाले आहे. अनेकांना या कार्यक्रमाला पोहोचणे शक्य न झाल्याने प्रवाशी हतबल झाले आहेत.
हार्बर मार्गावरील कणार्क ब्रिजचे काम सुरू असल्याने आज हार्बर मार्गावर पहाटे रेल्वे खोळंबली. या कामाबाबत प्रवाशांना कोणतीही पूर्व कल्पना देण्यात आली नव्हती. मात्र यामुळे आज प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणासाठी कार्यालयात शासकीय कर्मचारी आणि अन्य कार्यालयीन कर्मचाऱ्यांना वेळेवर पोहचणे अशक्य झाले. आज सकाळी ५ वाजून ६ मिनिटांनी निघणारी रेल्वे ६ वाजता जीटीबी रेल्वे स्थानकात पोहोचली. मात्र जीटीबी ते वडाळादरम्यान वारंवार सिग्नल मिळाल्याने ६ वाजून ६ मिनिटांनी वडाळ्याला पोहोचणारी रेल्वे तब्बल ५० मिनिटे उशिरा म्हणजे ६ वाजून ५६ मिनिटांनी वडाळा स्थानकात दाखल झाली.
वडाळा रेल्वे स्थानकावर हार्बर मार्गावरील सीएसएमटीकडे जाणाऱ्या सर्व गाड्या वडाळ्यापर्यंत चालवण्यात येतील, अशी सूचना रेल्वेकडून देण्यात आली आहे. या हार्बर मार्गावर कणार्क ब्रिजचे काम ५ वाजून ३० मिनिटांनी सुरू करण्यात आले. ते काम अजूनही पूर्ण न झाल्याने वाहतूक वडाळ्यापर्यंतच सुरू राहणार आहे. या सूचनेनंतर आधीच उशिरा झालेल्या रेल्वे प्रवाशांना ध्वजारोहणासाठी कार्यालयात पोहोचायचे कसे, याची चिंता सतावू लागली.