Malad Building Collapsed | मी बाहेर पडलो आणि तीन इमारती पत्त्याप्रमाणे कोसळल्या, मालाड इमारत दुर्घटना नेमकी कशी घडली?

| Updated on: Jun 10, 2021 | 9:47 AM

या ठिकाणी एका 3 मजली इमारतीचा दुसरा व तिसरा मजला बाजूला असलेल्या 1 मजली चाळीवर कोसळला. त्यामुळे 11 जणांना जीव गमवावा लागला.

Malad Building Collapsed | मी बाहेर पडलो आणि तीन इमारती पत्त्याप्रमाणे कोसळल्या, मालाड इमारत दुर्घटना नेमकी कशी घडली?
Malad Building Collapse १३४
Follow us on

मुंबई : मुंबईतील (Mumbai) मालाड पश्चिमेकडील मालवणी भागातील इमारत दुर्घटनेत आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये 6 लहान मुलांचा समावेश आहे. तर 8 जण गंभीर जखमी झाले आहे. सध्या दुर्घटनास्थळी मुंबई महापालिका (BMC) आणि अग्निशमन दलाकडून ढिगारा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. तर दुसरीकडे जखमींना मदतही केली जात आहे. (Mumbai Malad west building collapsed Incident local people reaction)

नेमकं काय घडलं ?

मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात भारतीय हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर मंगळवारपासूनच मुंबईसह राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. मंगळवारी 8 जून सकाळपासून सुरु असलेल्या पावसाने बुधवारी 9 जून रौद्ररुप धारण केलं. त्यामुळे पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणे अवघड झाले होते. पण रात्री दहा नंतर पावसाने थोडी उसंत घेतली.

त्यातच मुंबईतील मालाड पूर्व या ठिकाणी मालवणी गेट क्र. 8 येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात मोठी दुर्घटना घडली. या ठिकाणी एका 3 मजली इमारतीचा दुसरा व तिसरा मजला बाजूला असलेल्या 1 मजली चाळीवर कोसळला. त्यामुळे 11 जणांना जीव गमवावा लागला. सुरुवातीला एक दुमजली घर कोसळ्याची माहिती समोर आली होती. मात्र त्यानंतर काही सेकेंदाने पुन्हा काहीतरी कोसळल्याचा आवाज आला. यानंतर स्थानिकांना चार मजली इमारत कोसळल्याचे लक्षात आले.

तीन इमारती पत्त्याप्रमाणे कोसळल्या

या भागात राहणाऱ्या सिद्दीकी नावाच्या एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, मी पाऊस थांबल्याने रात्री 10.15 च्या सुमारास घराबाहेर आलो. त्यावेळी दोघांनी आम्हाला घराबाहेर पडा असे सांगितले. त्यांनी सांगितल्यानंतर मी लगेचच घराबाहेर पडलो. मी बाहेर पडलो आणि पाहताक्षणी आमच्या इमारतीच्या डेअरी जवळील तीन इमारत या पत्त्याप्रमाणे कोसळल्या, असे ते म्हणाले.

तर शाहनवाज खान या स्थानिकाने दिलेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण दुर्घटना रात्री 11 च्या सुमारास घडली. यात सुरुवातीला एक दुमजली घर कोसळले. यानंतर एकापाठोपाठ एक अशी तीन घर कोसळली. यातील एका घरात 7 जण राहत होते. त्यातील 5 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. या इमारतीच्या अगदी विरुद्ध दिशेला आणखी दोन इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. यामुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली आहे.

अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

मात्र त्यानंतर काही सेकेंदाने पुन्हा काहीतरी कोसळल्याचा आवाज आला. यानंतर स्थानिकांना चार मजली इमारत कोसळल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना फोन लावून घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई महापालिकेसह इतर प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. सध्या या ठिकाणी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. या दुर्घटनेत अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश 

यात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये 6 लहान मुलांपासून ज्येष्ठांचा समावेश आहे. तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई महापालिकाने मृतांसह गंभीर जखमींची यादी जाहीर केली आहे.

17 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश 

आतापर्यंत या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 17 जणांना आतापर्यंत सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे. मात्र 10 तास उलटूनही अद्याप रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. या दुर्घटनेतील जखमींना कांदिवलीतील शताब्दी आणि आजूबाजूच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.


(Mumbai Malad west building collapsed Incident local people reaction)

संबंधित बातम्या : 

Malad Building Collapsed | मालाड इमारत दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू, 7 गंभीर, पाहा संपूर्ण यादी

Malad Building Collapsed | मुंबईतील मालाडमध्ये इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना, 11 जणांचा दु्र्देवी मृत्यू, युद्धपातळीवर बचावकार्य