भाजपचा आक्रमक चेहरा मुंबईच्या महापौरपदी, शिक्षण समिती ते पाणी माफियांना लगाम घालणाऱ्या रितू तावडे कोण?

मुंबईच्या ७८ व्या महापौरपदासाठी भाजपने अनुभवी नगरसेविका रितू तावडे यांच्या नावाची घोषणा केली आहे. मराठा चेहरा आणि आक्रमक नेतृत्व असलेल्या तावडे यांच्या राजकीय प्रवासावर सविस्तर नजर.

भाजपचा आक्रमक चेहरा मुंबईच्या महापौरपदी, शिक्षण समिती ते पाणी माफियांना लगाम घालणाऱ्या रितू तावडे कोण?
ritu tawade
| Updated on: Feb 07, 2026 | 11:33 AM

मुंबई महानगरपालिकेच्या ७८ व्या महापौरपदासाठी भाजपने अनुभवी नगरसेविका रितु राजेश तावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली असून, ११ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत रितु तावडे महायुतीच्या अधिकृत उमेदवार असतील. मुंबईचे महापौरपद ‘सर्वसाधारण प्रवर्ग – महिला’ या गटासाठी आरक्षित झाल्याने भाजपने रितू तावडे यांच्या रूपाने एका अनुभवी आणि आक्रमक चेहऱ्याला संधी दिली आहे.

रितू तावडे कोण? 

  • रितू तावडे या घाटकोपरमधील प्रभाग क्रमांक १३२ मधून दुसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत.
  • ५३ वर्षीय तावडे या भाजपच्या अभ्यासू नेत्या मानल्या जातात.
  • त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपद यशस्वीपणे भूषवले आहे. महापालिकेच्या शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते.
  • रितू तावडे या स्वतः मराठा समाजातील असून एक खंबीर मराठी चेहरा आहेत. रितू तावडे यांचा मतदारसंघ गुजराती बहुल आहे, जिथे त्यांनी आपली पकड मजबूत केली आहे.
  • रितू तावडे यांनी महाराष्ट्र प्रदेश भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष आणि ईशान्य मुंबई महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष म्हणून प्रभावी काम केले आहे. सध्या त्या मुंबई महिला मोर्चा कार्यक्रम समितीच्या संयोजिका आहेत.

गाजलेली आंदोलने आणि सामाजिक कार्य

रितु तावडे यांची ओळख केवळ एक लोकप्रतिनिधी म्हणून नाही, तर जनसामान्यांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरणाऱ्या नेत्या म्हणून आहे.

१. जागतिक स्तरावर दखल (BBC लंडन): महिलांच्या अस्मितेशी खेळणाऱ्या विबत्स जाहिराती आणि पुतळ्यांविरोधात त्यांनी पुकारलेल्या लढ्याची दखल खुद्द ‘बीबीसी लंडन’ने घेतली होती. त्यांच्या आंदोलनामुळे अशा जाहिरातींवर बंदी घालण्यात आली.

२. महिला सुरक्षा: पालिका शाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत कठोर कारवाईची मागणी करत प्रशासनाला धारेवर धरले होते.

३. पाणी माफियांविरुद्ध लढा: घाटकोपरमधील पाणी टंचाई दूर करण्यासाठी त्यांनी काढलेला ‘हंडा मोर्चा’ अत्यंत गाजला, ज्यानंतर प्रशासनाने पाणी चोरांवर कडक कारवाई केली.

४. सक्षमीकरण: त्या ‘मराठा प्रतिष्ठा’ संस्थेच्या अध्यक्षा असून, ‘महिला आर्थिक विकास महामंडळाच्या’ (MAVIM) माध्यमातून त्यांनी हजारो महिलांना रोजगाराच्या संधी मिळवून दिल्या आहेत.

कौटुंबिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमी

१८ एप्रिल १९७३ रोजी जन्मलेल्या रितु तावडे यांचे शिक्षण एस.वाय.बी.कॉम पर्यंत झाले आहे. त्यांचे पती राजेश तावडे हे उद्योजक आहेत. रितु तावडे स्वतः व्यवसायातही सक्रिय असून त्या मे. आर. आर. इंटरप्राईजेसच्या प्रोप्रायटर आहेत.

भाजपचा राजकीय मास्टरस्ट्रोक

मुंबईत ८९ जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. रितु तावडे या मराठा समाजातील असल्या तरी, त्या गुजराती बहुल प्रभागातून मोठ्या मताधिक्याने निवडून येतात. त्यामुळे मराठी आणि गुजराती अशा दोन्ही मतदारांना सांधणारा चेहरा म्हणून भाजपने त्यांच्यावर विश्वास टाकला आहे. महायुतीकडे बहुमत असल्याने रितु तावडे या मुंबईच्या पुढच्या ‘प्रथम नागरिक’ होणे आता निश्चित मानले जात आहे.

Follow Us