मुंबईतील फेरीवाल्यांची खैर नाही, महापालिकेचा आतापर्यंतचा सर्वात कडक निर्णय, महापौरांचा थेट इशारा

मुंबईत आता फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक फेरीवाल्याची जन्मप्रमाणपत्र आणि आधार कार्डद्वारे कठोर तपासणी केली जाणार आहे. २३७ बोगस जन्मप्रमाणपत्रांच्या घोटाळ्यानंतर महापौर रितू तावडे यांनी हा आक्रमक पवित्रा घेतला आहे.

मुंबईतील फेरीवाल्यांची खैर नाही, महापालिकेचा आतापर्यंतचा सर्वात कडक निर्णय, महापौरांचा थेट इशारा
mumbai
| Updated on: Feb 13, 2026 | 2:53 PM

मुंबई महानगरपालिकेतून वितरित करण्यात आलेल्या २३७ बोगस जन्मप्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबई महापालिकेने ही प्रमाणपत्रे रद्द केली आहेत. पण तरीही अजूनही ती प्रमाणपत्रे अनधिकृत बांगलादेशी घुसखोरांच्या ताब्यात कशी? असा संतप्त सवाल रितू तावडे यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई न झाल्यास थेट सभागृहात प्रस्ताव आणण्याचा इशारा महापौरांनी दिला आहे.

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना मुंबईतील फेरीवाल्यांवर कशाप्रकारे कारवाई केली जाणार आहे अशा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. मुंबईतील फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक फेरीवाल्याची आता कठोरपणे तपासणी केली जाणार आहे, असे रितू तावडे यांनी म्हटले.

त्यांच्याविरुद्ध सभागृहात प्रस्ताव आणावा लागेल

आतापर्यंत २३७ बोगस जन्मप्रमाणपत्र मुंबई महापालिकेने दिले आहे. हे जन्मप्रमाणपत्र त्यांनी रद्द केले आहेत. पण जे ओरिजनल जन्मप्रमाणपत्र अनधिकृत बांग्लादेशींकडे आहेत, ते अजून त्यांच्याकडून घेण्यात आलेले नाही. जर मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही, तर त्यांच्याविरुद्ध सभागृहात प्रस्ताव आणावा लागेल. बांग्लादेशींना सांभाळण्याचे काम जर मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून होत असेल, तर आम्हाला कडक कारवाई करावी लागेल, असा कडक इशारा रितू तावडे यांनी दिला.

मुंबईतील फेरीवाल्यांवर कशाप्रकारे कारवाई होणार?

तसेच मुंबईत जे कोणी फेरीवाले, फुटपाथवर बसतात, त्या सर्वांचे जन्मप्रमाणपत्र आम्ही चेक करणार आहोत. ती मोहीम आम्ही जोरदार हातात घेणार आहोत. त्यामुळे जे कोणी फेरीवाले आहेत त्यांचे जन्मप्रमाणपत्र कठोर पद्धतीने चेक केले जाणार आहेत. यावर कोणतीही माफी केली जाणार नाही, असे रितू तावडे यांनी सांगितले.

कारण हा देशद्रोहाचा प्रकार आहे. तसेच ज्या कोणत्या बांग्लादेशींना सांभाळण्याचे काम अधिकारी करत असतील त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. हे करत असताना आम्ही प्रत्येक फेरीवाल्याचे जन्मप्रमाणपत्र, आधार कार्ड हे चेक केले जाईल, असेही रितू तावडे म्हणाल्या.

दरम्यान रितू तावडे यांनी मुंबईच्या महापौर म्हणून नुकताच पदभार स्वीकारला. महापौरपदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी रितू तावडे यांनी पहिली कारवाई कोणावर करणार याची माहिती दिली होती. मी महापौर म्हणून नाही तर सेवक म्हणून काम करणार आहे. मी पहिल्या दिवसापासून सांगते की जरी मी महापौर झाली तरी मुंबईची सेवक म्हणून काम करणार आहे. पदभार स्वीकारल्यानंतर मुंबईतील बेकायदेशीर बांगलादेशी फेरीवाल्यांवर कडक कारवाई करण्याला माझे प्राधान्य असेल, अशी माहिती रितू तावडे यांना दिली होती. त्यानुसार आता त्यांनी कारवाईला सुरुवात केली आहे.