
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईतील बहुप्रतिक्षित मेट्रो एक्वा लाईन ३ च्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. यामुळे आता मुंबईकरांना आरे ते कफ परेड हा प्रवास करता येणार आहे. आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिगत मेट्रो मार्गाचा आचार्य अत्रे चौक ते कफ परेड हा अंतिम टप्पा मुंबईकरांसाठी खुला करण्यात येणार आहे. गोरेगाव आरे ते कफ परेड असा संपूर्ण ३३.५ किलोमीटरचा प्रवास केवळ ५६ मिनिटात करता येणं शक्य होणार आहे. मुंबईतील वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय म्हणून या मेट्रोकडे पाहिले जात आहे. त्यातच आता आम्ही गिरगावकर या स्थानिक संस्थेने मेट्रो प्रशासनाला एक महत्त्वाचा इशारा दिला आहे.
आम्ही गिरगावकर या स्थानिक संस्थेने गिरगाव मेट्रो स्टेशन संदर्भात एक आक्षेप नोंदवला आहे. आजपासून सुरु होणाऱ्या मेट्रोमध्ये अधिकारी स्टाफ आणि कर्मचारी स्टाफ 80 टक्के मराठी असावा. तसेच मराठी भाषा असावी. अन्यथा मेट्रो स्थानकात कबुतर सोडू, असा इशारा आम्ही गिरगावकर या संस्थेने दिला आहे.
आज गिरगाव मेट्रो स्टेशन याचा शुभारंभ होत आहे. तसेच हे मेट्रो स्टेशन झाल्याने गिरगावकरांचा प्रवास सुखाचा व सोयीस्कर होणार आहे. त्यासाठी गिरगावकर जनता संबंधित कंत्राटदार आणि ज्यांनी त्यासाठी मेहनत घेतली त्यांचे आभारी आहे. आम्ही गिरगावकर टीम तर्फे शुभेच्छा तर आहेतच. पण त्यासोबतच प्रशासनाला एक प्रेमाचा सल्ला देत आहोत. या मेट्रो स्टेशनवर कार्यरत असलेल्या ८० टक्के अधिकारी तसेच इतर स्टाफमध्ये मराठी लोक असावेत. तसेच उर्वरित २० टक्के कर्मचाऱ्यांनाही मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, अन्यथा त्याच मेट्रो मध्ये कबुतर सोडू, असा गंभीर इशारा आम्ही गिरगांवकर या संस्थेने दिला आहे.
आम्ही गिरगावकर या संस्थेने मराठी भाषेच्या वापरास आणि स्थानिकांना रोजगार मिळण्यास प्राधान्य देण्याच्या दृष्टीने ही मागणी केली आहे. मुंबई शहराच्या विकासात महत्त्वाकांक्षी प्रकल्प जोडला जात असताना स्थानिक संस्कृती, भाषा आणि रोजगाराचे प्रश्न दुर्लक्षित होऊ नयेत, यामुळे ही मागणी करण्यात आली आहे.