Mumbai Metro 3 : मुंबई मेट्रो 3 मध्ये मोठा बदल, प्रवाशांना मिळणार दिलासा

मुंबई मेट्रो लाईन 3 वरील भूमिगत प्रवासात मोबाईल नेटवर्कची समस्या आणि ई-तिकीट काढताना होणारी गैरसोय दूर करण्यासाठी मुंबई मेट्रो प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

Mumbai Metro 3 : मुंबई मेट्रो 3 मध्ये मोठा बदल, प्रवाशांना मिळणार दिलासा
Updated on: Oct 15, 2025 | 8:52 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील बहुप्रतिक्षित मेट्रो लाईन 3 चे उद्घाटन करण्यात आले. यामुळे दक्षिण मुंबईतील कफ परेड ते पश्चिम उपनगरातील आरे जेवीएलआरपर्यंत पूर्णपणे मेट्रो कार्यरत झाली. लाखो मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे या मेट्रो ३ मार्ग सुरु झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता या भूमिगत मेट्रो मार्गावर प्रवाशांना भेडसावणाऱ्या एका गंभीर समस्येवर मुंबई मेट्रो प्रशासनाने महत्त्वपूर्ण तोडगा काढला आहे.

मोफत वायफाय सुविधा उपलब्ध

गेल्या काही दिवसांपासून मेट्रो मार्गावर मोबाईल नेटवर्कची गंभीर समस्या उद्भवली आहे. या समस्येवर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने अखेर महत्त्वपूर्ण तोडगा काढला आहे. आता मेट्रो-३ मार्गिकेतील सर्व स्थानकांवर प्रवाशांसाठी मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मेट्रो-३ मार्गिका ही पूर्णपणे भूमिगत असल्यामुळे मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क स्थानकांमध्ये आणि बोगद्यांमध्ये नीट काम करत नव्हते. यामुळे प्रवाशांना विशेषतः ई-तिकीट (E-ticket) काढताना मोठी गैरसोय होत होती. तसेच अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. प्रवाशांची ही समस्या लक्षात घेऊन एमएमआरसीने ही मोफत वाय-फाय सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

तिकीट काढताना गैरसोय टाळता येणार

या सुविधेमुळे प्रवाशांना स्थानकात प्रवेश करण्यापूर्वी Metro Connect 3 ॲपद्वारे लॉगिन करून अगदी सहजपणे आणि जलद गतीने ई-तिकीट काढता येणार आहे. ज्यामुळे त्यांचा वेळ वाचेल आणि तिकीट काढताना होणारी गैरसोय दूर होईल. ही सुविधा प्रवाशांचा मेट्रो प्रवासाचा अनुभव अधिक सुखकर आणि तंत्रज्ञान-आधारित बनवेल. विशेष म्हणजे, मेट्रो-३ चा शेवटचा म्हणजेच आचार्य अत्रे चौक ते कफ परेड हा टप्पा नुकताच ९ ऑक्टोबर रोजी वाहतूक सेवेत दाखल झाला आहे.

ई-तिकीट काढणे सोपे होणार

या महत्त्वाच्या टप्प्याच्या उद्घाटनामुळे ही संपूर्ण मार्गिका आता पूर्ण क्षमतेने धावत आहे. ही संपूर्ण मार्गिका कार्यान्वित झाल्यानंतर मुंबईतील वाहतुकीचे महत्त्वपूर्ण जाळे बनले आहे. या मेट्रो-३ ने दररोज सुमारे दीड लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत आहेत. प्रवाशांची वाढती संख्या आणि त्यांच्या गरजा लक्षात घेऊन एमएमआरसीने मोफत वायफायचे पाऊल अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. यामुळे केवळ ई-तिकीट काढणे सोपे होणार आहे. तर प्रवाशांना अत्यावश्यक वेळी इंटरनेटचा वापर करणेही शक्य होणार आहे.