
Mumbai MHADA Lottery : मुंबई ही स्वप्नांची नगरी आहे. या नगरीत रोज हजारो लोक त्यांचं आयुष्य घडवण्यासाठी दाखल होतात. यात काही लोकांना सुर गवसतो. त्यांना मुंबईत हक्काचे घर मिळते. पण काही चाकरमानी मात्र मुंबईत आयुष्यभर काम करतात परंतु त्यांना महागड्या मुंबईत हक्काचे घर खरेदी करता येत नाही. म्हाडा मात्र अगदी कमी किमतीत मुंबईत घर मिळण्याची संधी उपलब्ध करून देतं. मुंबईत दरवर्षी म्हाडाकडून लॉटरी काढली जाते. या लॉटरीमधील विजेत्यांना हक्काचे घर मिळते. सध्या मुंबई अशीच एक धमाकेदार योजना घेऊन आली आहे. या योजनेअंतर्गत मुंबईतील अत्यंत महाग अशा समजल्या जाणाऱ्या दादर, ताडदेव या परिसरात मुंबईकरांना हक्काचं घर मिळू शकतं. म्हाडाच्या या योजनेची लवकरच अंबलबजावणी केली जाईल.
मिळालेल्या माहितीनुसार म्हाडाकडून ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार एकूण 100 घरांची विक्री केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत घरांच्या विक्रीसाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. मुंबईतील महागड्या अशा पवई, दादर, ताडदेव अशा प्रतिष्ठीत भागात ही घरे आहेत. तीन वेळा सोडतीत समावेश करूनही अर्जदारांनी प्रतिसाद न दिल्याने विक्री न होऊ शकलेल्या घरांचा या योजनेत समावेश केला जाणार आहे. म्हाडाने अशी शंभर घरे निवडली असून ती प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर विकली जाणार आहेत. मुंबईतील तुंगा, पवई, दादर, ताडदेव अशा एकदम चकचकीत भागात ही घरे आहेत. त्यामुळे आता मुळ मुंबईत हक्काचे घर घेण्याची संधी आता चालून आली आहे.
म्हाडाची सोडत निघाली की घरे खरेदी करायला अक्षरश: हजारो अर्ज येतात. म्हाडाची घरे इतर खासगी विकासकांच्या घरांपेक्षा फारच स्वस्त असतात. म्हणूनच ही घरे घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज येतात. या घरांसाठी लॉटरी काढली जाते. ज्या अर्जदाराचे नशीब चांगले, त्यालाच हे घर मिळते. आता म्हाडा प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर तुंगा, दादर, ताडदेव, पवई या भागातील घरांची विक्री करणार आहे. परंतु मुंबईतील महागड्या भागात ही घरे असल्याने या घरांची किंमतही कोट्यवधी रुपयांत आहे.
उदाहरणादाखल पाहायचे झाल्यास म्हाडाने 2023 सालच्या सोडतीत ताडदेवच्या क्रिसेंट रोडवरील काही घरांचा समावेश केला होता. तेव्हा या घरांची किंमत 7 कोटी 57 लाखांच्या घरात होती. पण ही घरे कोणीच घेतली नव्हती. नंतर या घरांची किंमत एक ते दीड कोटी रुपयांनी कमी करण्यात आली. त्यामुळे या भागात म्हाडाअंतर्गत घर घ्यायचे असेल तर तुमच्याकडे कोट्यवधी रुपये असणे गरजेचे आहे. म्हणूनच म्हाडाने प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर ही घरे विकण्याचे ठरवले असले तरीही घरांची किंमत कोट्यवधी रुपये असल्याने सामान्यांना ती खरेदी करणे शक्य होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.