AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत मोनो रेलचा भीषण अपघात, डबा पटरीवरुन घसरल्याने मोठी दुर्घटना, Video समोर

मुंबईत मोनो रेलचा भीषण अपघात, डबा पटरीवरुन घसरल्याने मोठी दुर्घटना, Video समोर

| Updated on: Nov 05, 2025 | 12:14 PM
Share

मुंबईतील वडाळा येथे चाचणीदरम्यान मोनोरेलचा एक डबा रुळावरून घसरला. नवीन CBTC सिग्नल प्रणालीच्या चाचण्या सुरू असताना हा अपघात झाला, ज्यात डबा खांबावर आदळला. सुदैवाने प्रवासी नसल्याने कोणी जखमी झाले नाही.

मोनोरेल आणि तांत्रिक बिघाड हे नातं काही संपता संपत नसल्याचे पाहायला मिळत आहे. आज मुंबईत पुन्हा एकदा मोनो रेलचा अपघात झाला आहे. मुंबईतील वडाळा येथे चाचणी घेत असलेल्या एका मोनोरेल ट्रेनच्या डब्याचा अपघात झाला. या मोनोरेलचा एक डबा पटरीवरून खाली उतरून (Derail) एका बाजूला झुकल्याने मोठा अपघात झाला. हा अपघात वडाळा पूर्व येथील आरटीओ जंक्शनजवळ घडला. सुदैवाने यात प्रवासी नव्हते. त्यामुळे कोणीही जखमी झालेले नाही.

महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, अत्याधुनिक सिग्नल प्रणाली आणि नवीन गाड्यांची चाचणी सुरू असताना आज बुधवार सकाळी वडाळा परिसरात मोनोरेलचा अपघात घडला. यावेळी ट्रायल रन सुरु असताना मोनोरेलचा एक डबा पटरीवरून खाली उतरून एका बाजूला झुकला. आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास वडाळा पूर्व येथील आरटीओ जंक्शनजवळी वडाळा डेपोजवळ हा अपघात घडला. यावेळी नवीन मोनोरेल रॅकचा एक डबा ट्रॅक बदलत असताना काही तांत्रिक बिघाडामुळे रुळावरून खाली घसरला. तो बाजूला झुकून ट्रॅकच्या बाजूला असलेल्या खांबावर आदळला. या अपघातामुळे ट्रेनचे अलाइनमेंट पूर्णपणे बिघडले आहे.

सुदैवाने, या मोनोरेलमध्ये प्रवासी नव्हते. केवळ दोन तांत्रिक कर्मचारी या चाचणी प्रक्रियेत होते. MMMOCL ने दिलेल्या माहितीनुसार, परिस्थिती तत्काळ नियंत्रणात आणली गेली. यामुळे कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

महामुंबई मेट्रोचे स्पष्टीकरण काय?

मोनोरेलची सुरक्षितता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी MMMOCL ने अत्याधुनिक कम्युनिकेशन-बेस्ड ट्रेन कंट्रोल (CBTC) सिग्नलिंग प्रणाली लागू करण्यासाठी काम हाती घेतले आहे. सध्या मेधा एसएमएच रेल प्रायव्हेट लिमिटेड (Medha SMH Rail Pvt. Ltd.) या कंत्राटदारांमार्फत या नवीन प्रणालीची आणि गाड्यांची चाचणी सुरू आहे. या चाचण्यांचा मुख्य उद्देश तांत्रिकदृष्ट्या अत्यंत बिकट परिस्थितीत (‘worst-case’ scenario) प्रणालीची प्रतिक्रिया तपासणे हा असतो. अशा नियंत्रित परिस्थितीत चाचण्या घेणे ही मानक प्रक्रियेचा भाग आहे. नागरिकांनी घाबरू नये, या केवळ अंतर्गत तांत्रिक चाचण्या आहेत, असे स्पष्टीकरण महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने दिले आहे.

या अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल, मोनोरेलचे कर्मचारी आणि एमएमआरडीए अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या घसरलेला डबा काढण्याचे आणि ट्रॅक दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. नवीन तंत्रज्ञान आणि गाड्यांच्या चाचणीदरम्यानच इतका मोठा बिघाड झाल्याने, मोनोरेलच्या नवीन रॅकच्या सुरक्षिततेवर आणि कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह समोर आले आहे. या अपघातामुळे मोनोरेल सेवा पुन्हा सुरू होण्यास किती विलंब लागणार याची चिंता आता मुंबईकरांना सतावत आहे.

Published on: Nov 05, 2025 11:56 AM