सुविधांचा अभाव, नियमांची पायमल्ली, निष्काळजीपणा.. मुंबईतील बोट अपघाताला जबाबदार कोण?
मुंबईतील 'गेट वे ऑफ इंडिया' इथून एलिफंटासाठी रवाना झालेल्या 'नीलकमल' या बोटीतील प्रवाशांसाठी बुधवारचा दिवस काळा दिवस ठरला. नौदलाच्या स्पीड बोटने दिलेल्या जोरदार धडकेनंतर ही बोट कलंडली आणि बुडाली. यात 13 प्रवाशांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’वरून एलिफंटाला आणि अलिबागला जाण्यासाठी दररोज असंख्य प्रवासी फेरीने प्रवास करतात. मात्र बुधवारचा दिवस ‘नीलकमल’ या फेरीतील प्रवाशांसाठी काळा दिवस ठरला. बुधवारी दुपारी ‘गेट वे ऑफ इंडिया’ इथून घारापुरीकडे ‘नीलकमल’ ही प्रवासी बोट निघाली होती. या बोटीत 100 पेक्षा अधिक प्रवासी होते, ज्यामध्ये 20 लहान मुलांचाही समावेश होता. दुपारी 3.55 वाजता अचानक नौदलाच्या एका स्पीड बोटीने या फेरीला उजव्या बाजूने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की त्यामुळे ‘नीलकमल’ बोट कलंडली आणि बुडू लागली. या भीषण अपघातात 13 जणांना आपले प्राण गमवावे लागले. तर किमान 98 जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर बोटीवरील सुविधांचा अभाव, नीलकमल बोटीचा वेग, बोटीतील क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी, समुद्रमार्गे प्रवास करणाऱ्यांची सुरक्षा.. यांसारखे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ...