
मुंबई | 13 सप्टेंबर 2023 : मराठा आरक्षणासाठी आग्रही असणारे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सोळावा दिवस आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलं आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर गंभीर आरोप केलेत. राज्यातील शिंदे-फडवणवीस-पवार सरकारला मनोज जरांगे पाटील यांना संपवायचंय आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. इंडिया आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीवरही संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर गंभीर आरोप केलेत. मराठा आरक्षणासाठी शिंदे सरकार काही करू इच्छित नाही. सरकार केवळ आश्वासन देतं. हे सरकार मनोज जरांगे पाटील यांना मारू इच्छितं. त्यांना हे सरकार संपवू पाहातंय, असं संजय राऊत म्हणालेत.
इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची आज पहिली बैठक आहे. यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. मुंबईत इंडिया आघाडी बैठकीत त्या संदर्भात निर्णय झाला. इंडिया आघाडीच्या कोऑर्डिनेशन कमिटीची पहिली बैठक आज दिल्लीत शरद पवारांचे निवासस्थानी होणार आहे. 14 सदस्य या बैठकीला उपस्थित राहतील. समितीमध्ये 14 मेंबर उपस्थित राहतील. तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी उपस्थित राहणार नाही .आत्ताच माझ त्यांच्या नेत्यांशी बोलणं झालं. आजच बैठक आहे आणि आजच अभिषेक बॅनर्जी यांना ईडीची नोटीस देऊन समन्स दिला आहे, असं संजय राऊत म्हणाले.
अभिषेक बॅनर्जी यांना ईडीने नोटीस पाठवणं हा रडीचा डाव आहे. ही बदल्याची कारवाई आहे. अभिषेक बॅनर्जी यांच्यावरती गेल्या सातत्याने दबाव सूड बुद्धीचे राजकारण सुरू आहे. काही नेत्यांवरती दबाव आहे. माझ्यावरती देखील दबाव आहेत. आम्ही यातून एक मार्ग असा काढलेला आहे. काही झालं तरी या दबावामुळे झुकायचं नाही हेच आमचं प्रत्युत्तर आहे. अभिषेक बॅनर्जी यांना आजच्या बैठकीत उपस्थित राहू नये, म्हणून त्यांना समज पाठवण्यात आले आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर घणाघात केलाय.