
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कबुतरखान्यांच्या मुद्द्यावरुन वाद निर्माण झाला होता. आता अखेर या वादावर पडदा पडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपामुळे कबुतरखान्याचा वाद मिटला आहे. कबुतरखाने अचानक बंद केल्यामुळे निर्माण झालेल्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी कबुतरखाने अचानक बंद करणे योग्य नाही, असे म्हटले आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार गणेश नाईक, मंत्री गिरीश महाजन आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासारखे महत्त्वाचे नेते उपस्थित होते.
या बैठकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कबुतरखान्याबद्दल बाजू मांडली. यावेळी त्यांनी कबुतरांच्या संरक्षणाची बाजू घेतली. “कबुतरखाने अचानक बंद करणे योग्य नाही. कबुतरखान्यांमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात, असे आरोप होत असले, तरी त्याचा शास्त्रीय अभ्यास करण्याची गरज आहे. तसेच, कबुतरांना खाऊ घालण्यासाठी (फिडिंग) एक विशिष्ट वेळ निश्चित करण्याचा नियम तयार करता येऊ शकतो”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यासोबतच कबुतरांच्या विष्ठेमुळे होणाऱ्या स्वच्छतेच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी विशेष तंत्रज्ञानाचा वापर करा, असा सल्लाही देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
या प्रकरणी उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने कबुतरांच्या बाजूने ठामपणे आपली भूमिका मांडली पाहिजे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. पर्यायी व्यवस्था होत नाही तोपर्यंत महापालिकेने ‘नियंत्रित फिडिंग’ (Control Feeding) सुरू करावे, असेही त्यांनी सूचित केले. गरज पडल्यास या निर्णयासाठी सर्वोच्च न्यायालयात जाऊ, अशी तयारीही मुख्यमंत्र्यांनी दर्शवली आहे.
या बैठकीनंतर मंगलप्रभात लोढा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कबुतरखाने अचानक बंद करू नयेत यासाठी आता उच्च न्यायालयात सरकार प्रतिनिधित्व करणार आहे. लवकरच एक समिती गठीत केली जाईल. ज्या कबुतरखान्यांवर ताडपत्री टाकून ते बंद करण्यात आले होते, त्या आता काढल्या जातील. तसेच, कबुतरांच्या विष्ठेची स्वच्छता करण्यासाठी ‘टाटा’ने तयार केलेल्या नवीन मशीनचा वापर केला जाणार आहे, जेणेकरून कोणालाही कोणताही त्रास होणार नाही, अशी माहिती मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
कबुतरखाने सुरू झाल्यावर कबुतरांना नियंत्रित स्वरूपातच खाद्य दिले जाईल, जेणेकरून नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. एकंदरीत, मुख्यमंत्र्यांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे कबुतरप्रेमींना मोठा दिलासा मिळाला असून, लवकरच यावर समाधानकारक तोडगा काढला जाईल, असे म्हटले जात आहे.