तुमच्या खिशातली नोट नकली तर नाही? मुंबईत नकली नोटा छापणारे अटकेत

| Updated on: Jan 27, 2021 | 6:39 PM

मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रॅच यूनिट 7 च्या टीमने नकली नोटा छापणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे (Mumbai Police bust fake currency gang)

तुमच्या खिशातली नोट नकली तर नाही? मुंबईत नकली नोटा छापणारे अटकेत
Follow us on

मुंबई : तुमच्या खिशातली नोट नकली तर नाही? असा प्रश्न विचारण्यामागील कारणही अगदी तसंच आहे. कारण मुंबईत बनावट, नकली नोटा छापणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे नकली नोटा छापणारे भामटे शंभर रुपयांच्या बदल्यात दोनशे रुपये देतो, असं सांगत लोकांना लुबाडायचे. त्यामुळे अशा कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. याशिवाय कोणतीही नोट घेताना ती नोट खरी आहे की खोटी याची शाहनिशा करुनच खिशात टाका, असं आवाहन आम्ही या निमित्ताने तुम्हाला करतोय (Mumbai Police bust fake currency gang).

मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रॅच यूनिट 7 च्या टीमने नकली नोटा छापणाऱ्यांविरोधात ही मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी प्रिंटरच्या साहाय्याने घरात नकली नोटा छापणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला. या प्रकरणी चारही मुख्य आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे. विशेष म्हणजे पोलिसांना आरोपीच्या घरातून 35 लाख्यांच्या बनावट नोटा सापडल्या आहेत. पोलिसांनी सर्व बनावट नोटा जप्त केल्या आहेत.

आरोपी घरात बनावट नोटा छापायचे. त्यानंतर त्या नोटा ते मुंबई आणि आजूबाजूच्या बाजारात 100 रुपयांच्या बदल्यात 200 रुपये देण्याच्या आमिषात लोकांना वाटायचे. पोलिसांना याबाबत खबर लागली. मुंबई क्राईम ब्रँचच्या यूनिट 7 ला काही लोक मुंबईत 26 जानेवारीला नकली नोटा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी नियोजन करत आरोपींना रंगेहाथ पकडलं. आरोपींकडे जवळपास 2 लाख 80 हजारांच्या नकली नोटा आढळल्या. पोलिसांनी त्या सर्व खोट्या नोटा जप्त केल्या.

पोलिसांनी याप्रकरणी विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा अधिक तपास केला असता या प्रकरणात आणखी दोन आरोपी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हे दोनही आरोपी पालघरमध्ये वास्तव्यास होते. पोलिसांनी मुख्य आरोपी महेंद्र खंडसकरच्या घरावर छापा टाकला. यावेळी पोलिसांना त्याच्या घरात 32 लाख 54 हजार रुपयांच्या नकली नोटा मिळाल्या (Mumbai Police bust fake currency gang).

पोलिसांनी सर्व नकली नोटा, प्रिंटर, शाई आणि कागदं जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी महेंद्र खंडसकर, अब्दुल्ला कल्लू खान, फारुख पाशा चौधरी, अमिन उस्मान शेख या आरोपींना अटक केली. हे सर्व आरोपी 3 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत राहणार आहेत.

याप्रकरणी डीसीपी अकबर पठाण यांनी प्रतिक्रिया दिली. “आरोपी लोकांकडून शंभर रुपये घ्यायचे आणि त्या बदल्यात दोनशे रुपयांच्या नकली नोटा द्यायचे. याशिवाय ते नोटांचे मार्केटिंग देखील करायचे. नोटांचे मार्केटिंग करणाऱ्यांना ते 10 टक्के कमिशन द्यायचे”, अशी माहिती अकबर पठाण यांनी दिली.

हेही वाचा : जेव्हा महाराष्ट्राच्या प्रकल्पांसाठी गडकरी, जयंत पाटील आणि फडणवीस एक होतात!