जेव्हा महाराष्ट्राच्या प्रकल्पांसाठी गडकरी, जयंत पाटील आणि फडणवीस एक होतात!

देशातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील राजकीय संस्कृती अत्यंत वेगळी असल्याचं आज पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. (jayant patil, devendra fadnavis meets nitin gadkari at delhi)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:16 PM, 27 Jan 2021
जेव्हा महाराष्ट्राच्या प्रकल्पांसाठी गडकरी, जयंत पाटील आणि फडणवीस एक होतात!

नवी दिल्ली: देशातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील राजकीय संस्कृती अत्यंत वेगळी असल्याचं आज पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. राजकारणात एकमेकांवर कितीही चिखलफेक केली तरी जेव्हा राज्याच्या हिताचा आणि विकासाचा प्रश्न येतो तेव्हा महाराष्ट्रातील नेते एका छताखाली एकत्र येऊन तो प्रश्न तडीस नेतात हे सुद्धा आज अधोरेखित झालं आहे. निमित्त होतं केंद्रीय पर्यावरण मंत्री नितीन गडकरी, राज्यातील विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या एकत्र येण्याचं. (jayant patil, devendra fadnavis meets nitin gadkari at delhi)

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील आज दिल्लीत आहेत. महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक होती. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी फडणवीस आणि पाटील आले होते. यावेळी भाजपचे खासदार गिरीश बापट, खासदार सुनील मेंढे, नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी, महापालिका आयुक्त, अधिकारी, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत नागपूरमधील गोसेखुर्द प्रकल्प, नाग नदीचे पुनरुज्जीवन आणि मुळा-मुठा नदीच्या पुनरुज्जीवनाबाबत चर्चा करण्यात आली.

फडणवीस-पाटील एकत्र

या बैठकीच्या निमित्ताने फडणवीस, गडकरी आणि पाटील बऱ्याच दिवसानंतर एकत्र आले. विकास प्रकल्पाच्या अनुषंगाने हे नेते एकत्र आले होते. या बैठीकत पाटील हे गडकरींच्या बाजूलाच डाव्या हाताला बसले होते. तर फडणवीस गडकरींच्या उजव्या हाताला एक खुर्ची सोडून बसले होते. या बैठकीत अत्यंत गंभीरपणे चर्चा सुरू होती. सर्वच नेते कान देऊन ऐकताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील नेते दिल्लीत विकास प्रकल्पाच्या निमित्ताने एकत्रित भेटण्याचं हे चित्रं बोलकं आणि दिलासादायक होतं. निवडणूक काळात कितीही आरोप-प्रत्यारोप केले तरी निवडणुकीनंतर वैरही संपतं. महाराष्ट्रातील राजकीय संस्कृती ही मित्रत्वाची आहे, हेच पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.

राजकीय चर्चा नाही

गडकरी, फडणवीस आणि पाटील एकत्र आल्याने राजकीय चर्चा रंगली नसती तर नवलंच. हे तिन्ही नेते एकत्र आल्याने त्याचे राजकीय अर्थही काढले जाऊ लागले आहेत. मात्र, ही केवळ प्रकल्पांचा निपटारा करण्यासाठीची भेट असून त्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं सांगितलं जात आहे. जयंत पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अत्यंत जवळचे आहेत. त्यातच आजच्या दिल्लीत बैठकीला फडणवीसही उपस्थित होते. फडणवीस या बैठकीला का आले? त्यांचा या बैठकीशी काय संबंध? गोसेखुर्द प्रकल्पावर चर्चा करण्यासाठी फडणवीस आले का? मग फडणवीसांनाच का बोलावले? असे अनेक प्रश्न उपस्थित राहत असून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. बैठकीशी संबंध नसताना फडणवीस यांचं दिल्लीत येणं आणि पाटील यांचं बैठकीत असणं या साऱ्या गोष्टी अचंबित करणाऱ्या असल्याचं राजकीय निरीक्षक सांगत आहेत.

गोसेखुर्दचा टार्गेट सेट

यावेळी गोसेखुर्द प्रकल्प 2023 पर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पासाठी एकूण 5 हजार कोटींचा खर्च येणार आहे. मात्र, दरवर्षी 1500 कोटी रुपये जरी मिळाले तरी हा प्रकल्प दोन वर्षात मार्गी लागेल, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

नाग नदी वळण घेणार

नागपूरची पुरातन नाग नदीचं पुनरुज्जीवन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. हा प्रकल्प एकूण 1700 कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मंजुरीही मिळाली होती. मात्र, कोरोनामुळे हे काम थांबलं होतं. कोरोनामुळे आर्थिक संकट उभं राहिल्याने सरकारने कोणताही नवा प्रकल्प हाती न घेण्याचं ठरवलं होतं. मात्र, केंद्रीय अर्थमंत्र्यांशी बोलून हा प्रकल्प सुरू करण्याची परवानगी मिळवली आहे. त्यामुळे आता सल्लागार वगैरे नेमून टेंडर प्रक्रिया सुरू करू, त्यामुळे लवकरच हा प्रकल्प मार्गी लागेल, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं. (jayant patil, devendra fadnavis meets nitin gadkari at delhi)

मुळा-मुठा प्रकल्प पूर्ण होणार

या बैठकीत पुण्यातील मुळा-मुठा नदीचं पुरुज्जीवन करण्याचा निर्णय घेण्यात आला. 1200 कोटींचा हा प्रकल्प आहे, तो लवकरात लवकर पूर्ण करण्याचा यावेळी निर्णय घेण्यात आला. (jayant patil, devendra fadnavis meets nitin gadkari at delhi)

 

संबंधित बातम्या:

शेतकरी आंदोलनात फूट?; हिंसेनंतर दोन शेतकरी संघटनांची आंदोलनातून माघार!

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळ्या घातल्या, दिल्लीतही तसंच वातावरण तयार केलं : सुधीर मुनगंटीवार

LIVE : गोसीखुर्द प्रकल्प 2023 पर्यंत पूर्ण करणार, गडकरी-जयंत पाटील-फडणवीसांची दिल्लीत बैठक

(jayant patil, devendra fadnavis meets nitin gadkari at delhi)