शेतकरी आंदोलनात फूट?; हिंसेनंतर दोन शेतकरी संघटनांची आंदोलनातून माघार!

शेतकरी आंदोलनात फूट?; हिंसेनंतर दोन शेतकरी संघटनांची आंदोलनातून माघार!

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान हिंसा भडकल्याने आता शेतकरी आंदोलनातच फूट पडल्याचं चित्रं आहे. (Rashtriya Kisan Mazdoor Sanghatan, Bharatiya Kisan Union withdraw from farmers protests)

भीमराव गवळी

|

Jan 27, 2021 | 5:32 PM

नवी दिल्ली: दिल्लीतील शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान हिंसा भडकल्याने आता शेतकरी आंदोलनातच फूट पडल्याचं चित्रं आहे. या आंदोलनातून दोन शेतकरी संघटनांनी माघार घेतली असून आंदोलनाशी आमचा काही संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. दोन संघटनांनी अचानक आंदोलनातून माघार घेण्याचा घेतलेला निर्णय हा शेतकरी आंदोलनासाठी मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे. (Rashtriya Kisan Mazdoor Sanghatan, Bharatiya Kisan Union withdraw from farmers protests)

दिल्लीत ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसेनंतर राष्ट्रीय किसान मजदूर संघ आणि भारतीय किसान यूनियनने (भानू) आंदोलनातून माघार घेत असल्याचं जाहीर केलं आहे. राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचे नेते व्ही.एम. सिंग यांनी पत्रकार परिषद घेऊन शेतकरी आंदोलनातून माघार घेत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे इथून पुढे ही संघटना या आंदोलनात राहणार नाही. अशा प्रकारे आंदोलन चालत नसतं. इथं कुणाला मार खाण्यासाठी किंवा शहीद करण्यासाठी आम्ही आलेलो नाही, असा संताप त्यांनी व्यक्त केला. तसेच शेतकरी नेते राकेश टिकैत सरकारसोबत चर्चेला गेल्याचा आरोपही त्यांनी केला. टिकैत सरकारसोबत चर्चेला गेले पण त्यांनी तिथे उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला का? त्यांनी धान खरेदीबाबतचे प्रश्न या बैठकीत मांडलेत का? आम्ही केवळ पाठिंबा देतो आणि काही लोक नेते बनत आहेत. हे आपलं काम नाही. हिंसेशी आमचं काहीही घेणंदेणं नाही, असंही ते म्हणाले.

राष्ट्रध्वजाची प्रतिष्ठा राखलीच पाहिजे

भारताचा ध्वज, त्याची प्रतिष्ठा आणि मर्यादा राखणं हे सर्वांचं काम आहे. ध्वजाच्या प्रतिष्ठेला कुणी धक्का पोहोचवला असेल तर तशी कृती करणारे चुकीचे आहेत आणि ती कृती करू देणारेही चुकीचे आहे. आयटीओमध्ये एक शेतकरी शहीद झाला. या शेतकऱ्याला जी व्यक्ती रॅलीत घेऊन गेली होती, तिच्याविरोधात कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

सहा नेत्यांवर गुन्हे दाखल

दरम्यान आखून दिलेल्या मार्गावरून रॅली काढण्यात न आल्याने सहा शेतकरी नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोपही या नेत्यांवर करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी शेतकरी नेते राकेश टिकैत, डॉ. दर्शनपाल, जोगिंदर सिंग, बुटा सिंग, बलबीर सिंग राजेवाल आणि राजेंद्र सिंग यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आल आहेत. ही रॅली काढण्यासाठी या नेत्यांची सरकार आणि पोलिसांशी वारंवार चर्चा झाली होती. त्यात त्यांना काही नियम घालून देण्यात आले होते. या सर्व नेत्यांनी एनओसींवर सही केली होती. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

काय घडलं होतं रॅलीत?

काल मंगळवारी शेतकऱ्यांनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं होतं. शेतकऱ्यांना रॅलीसाठी जो मार्ग आखून दिला होता. त्या मार्गावरून शेतकऱ्यांनी रॅली काढली नाही. शेतकऱ्यांनी वेगळ्याच मार्गाने रॅली काढली होती. शेतकऱ्यांचा एक जत्था गाजीपूर बॉर्डरवरून आयटीओला पोहोचला होता. हा जत्था लाल किल्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करत होता. अक्षरधाम-नोएडा मार्गावर पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांना आऊटर रिंगरोडवरून जाण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, या मार्गाने न जाता आंदोलकांनी दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि शेतकरी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. याच दरम्यान शेतकऱ्यांमधून पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरू झाली. ही दगडफेक सुरू होताच पोलिसांनीही शेतकऱ्यांवर लाठीचार्ज सुरू केला. त्यामुळे शेतकरी अधिकच आक्रमक झाले. शेतकऱ्यांनी पोलिसांच्या बॅरिकेट्स तोडल्या. शेतकऱ्यांनी काही वाहनांची तोडफोडही केली. परिणामी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करावा लागला. (Rashtriya Kisan Mazdoor Sanghatan, Bharatiya Kisan Union withdraw from farmers protests)

संबंधित बातम्या:

“हिंसाचारात भाजप सामील असल्याचा अपप्रचार, केंद्राला जबाबदार धरणं चुकीचं”

आशिष शेलार साहेब, खरं सांगा दीप सिद्धू तुमचे कोण?; मिटकरींचा सवाल

दिल्ली हिंसाचारात ज्याचं नाव समोर येतंय तो लक्खा सिधाना कोण आहे?

(Rashtriya Kisan Mazdoor Sanghatan, Bharatiya Kisan Union withdraw from farmers protests)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें