वरळी सी-लिंकवर 250 च्या स्पीडने कार पळवली अन्… मुंबईत पोलिसांनी चालकाला दिला दणका, काय घडलं?

वरळी सी-लिंकवर २५० किमी वेगाने धावणारी लॅम्बोर्गिनी मुंबई पोलिसांनी जप्त केली आहे. कारचा टॉप स्पीड चेक करण्यासाठी चालकाने नियमांची पायमल्ली केली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

वरळी सी-लिंकवर 250 च्या स्पीडने कार पळवली अन्... मुंबईत पोलिसांनी चालकाला दिला दणका, काय घडलं?
Lamborghini
| Updated on: Dec 18, 2025 | 12:03 PM

मुंबईच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या वरळी सी-लिंकवर वेगाचा थरार दाखवणे एका कार चालकाला चांगलेच महागात पडले आहे. ताशी २५० किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने आलिशान लॅम्बोर्गिनी कार पळवणाऱ्या चालकावर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी त्याची लॅम्बोर्गिनी ही कार जप्त केली आहे. या प्रकरणानंतर आता पोलिसांनी रस्त्यावरील सुरक्षिततेशी तडजोड करणाऱ्यांवर आता केवळ दंड लावून चालणार नाही, तर थेट वाहन जप्तीची कारवाई केली जाईल, असा सज्जड दम दिला आहे.

नेमकं प्रकरण काय?

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये एक पिवळ्या रंगाची लॅम्बोर्गिनी कार वरळी सी-लिंकवर वाऱ्याच्या वेगाने धावताना दिसत होती. विशेष म्हणजे, वरळी सी-लिंकवर वाहनांसाठी कमाल वेग मर्यादा (Speed Limit) ताशी ८० किलोमीटर इतकी निश्चित करण्यात आली आहे. मात्र, या कारने मर्यादेच्या तब्बल तिप्पट म्हणजेच २५० किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने वरळी सी-लिंकवर कार चालवल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा प्रकार केवळ वाहतूक नियमांचे उल्लंघन नसून इतर प्रवाशांच्या जीवाशी खेळणारा होता.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एका युजरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून मुंबई पोलिसांकडे याची तक्रार केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत वरळी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी तपासाद्वारे आणि सी-लिंकवरील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने कारचा शोध घेतला. या तपासात ही कार HR 70 F 1945 या क्रमांकाची असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी या कारच्या नंबरवरून मालकाचा शोध घेतला असता, ही कार अहमदाबाद येथील व्यावसायिक नीरव पटेल यांच्या मालकीची असल्याचे समोर आले.

मात्र, ज्यावेळी हा प्रकार घडला, त्यावेळी कार नीरव पटेल नाही तर फैज अडेनवाला नावाचा एक कार डीलर चालवत होता. मिळालेल्या माहितीनुसार, कारची टॉप स्पीड किती आहे हे तपासण्यासाठी त्याने टेस्ट ड्राईव्ह घेतली. यासाठी त्याने सी-लिंकचा वापर केला आणि इतक्या वेगाने गाडी पळवली.

याप्रकरणी वरळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता, जो आता फैज अडेनवाला या चालकाच्या नावाने नमूद करण्यात आला आहे. त्याच्यावर निष्काळजीपणे वाहन चालवणे आणि इतरांचा जीव धोक्यात घालणे यासारख्या गंभीर कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच, तो व्हायरल व्हिडीओ नक्की कधीचा आहे आणि कारची कागदपत्रे कायदेशीर आहेत का, याचाही सविस्तर तपास पोलीस करत आहेत.