खळबळजनक! पवईच्या IIT मुंबईमध्ये विद्यार्थ्याचा टोकाचा निर्णय; विद्यार्थी आक्रमक
mumbai shocking : पवईच्या IIT मुंबईमध्ये विद्यार्थ्याचा टोकाचा निर्णय घेतला आहे. या घटनेनंतर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

कृष्णा सोनारवाडकर, प्रतिनिधी : पवई आयआयटी मुंबईमधून मोठी बातमी हाती आली आहे. नामांकित पवई आयआयटी मुंबईमध्ये एका विद्यार्थ्याने आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. विद्यार्थ्याने शुक्रवारी सांयकाळच्या सुमारास टोकाचा निर्णय घेतल्यानंतर आता विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विद्यार्थ्यांनी कॉलेज कॅम्पस परिसरात आंदोलनाचा नारा दिलाय. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मुंबईच्या पवई आयआयटी मुंबईमध्ये आणखी एका विद्यार्थ्याने आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. गेल्या काही वर्षांपासून या कॉ़लेजमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आयुष्य संपवल्याच्या घटना घडल्याचे समोर आलं आहे. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी देखील एका विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं. या विद्यार्थ्याने कॉलेजच्या हॉस्टेल नंबर 4 मध्ये जीवन संपवलं. आयुष्य संपवण्याचे वारंवार प्रकार होत असल्याने IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांकडून आंदोलन सुरू करण्यात आलं. आता घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
B.Tech अभ्यासक्रमातील विद्यार्थ्याने हॉस्टेलमध्ये आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. परीक्षेदरम्यान कथित कॉपी करताना विद्यार्थी पकडला गेल्याची माहिती आहे. त्यामुळे कथित कॉपी प्रकरणी विद्यार्थ्यावर कारवाई होणार असल्याचे शिक्षकांनी सांगितल्याची माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थी हॉस्टेलमध्ये गेल्याचे समोर आलं. त्याने संध्याकाळच्या सुमारास विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. विद्यार्थ्याच्या मृत्यूची माहिती मिळताच IIT बॉम्बे कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली. विद्यार्थ्यांकडून IIT प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी आणि आंदोलन केले. विद्यार्थ्यांनी संबंधित लोकांवर कठोर कारवाईची मागणी केली. घटनेंतर कॅम्पसमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी जमले होते. आंदोलनामुळे काही काळ IIT बॉम्बे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही. कथित कॉपी प्रकरणाचा आत्महत्येशी संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे. प्रशासन आणि पोलिसांकडून संपूर्ण घटनेची चौकशी सुरू आहे. त्यामुळे आता या प्रकरणात काय कारवाई केली जाते, याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
