मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील टँकर 32 तासाने हटवला, दीड लाख लोकांची सुटका, वाहतुकीची सद्यस्थिती काय?

पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर ३२ तासांच्या थरारानंतर गॅस टँकर हटवण्यात आला असला, तरी प्रवाशांचा खोळंबा अद्याप कायम आहे. मुंबई आणि पुणे दोन्ही बाजूला वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या असून वाहतूक पूर्वपदावर येण्यास किती वेळ लागेल? सविस्तर वाचा.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील टँकर 32 तासाने हटवला, दीड लाख लोकांची सुटका, वाहतुकीची सद्यस्थिती काय?
Mumbai Pune Expressway
| Updated on: Feb 05, 2026 | 10:59 AM

पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ अपघातग्रस्त झालेला गॅस टँकर तब्बल ३२ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर हटवण्यात प्रशासनाला यश आले आहे. बुधवारी रात्री १ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास चार मोठ्या हायड्रोलिक क्रेनच्या सहाय्याने हा टँकर बाजूला करण्यात आला. त्यानंतर महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात प्रशासनाला यश आले आहे. मात्र अद्यापही मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या आणि पुण्याकडून मुंबईकडे येणाऱ्या दोन्ही मार्गांवरील वाहतुकीचे तीन तेरा वाजल्याचे दिसत आहेत. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाल्याचे पाहायला मिळत आहे.

नेमकं काय घडलं?

मंगळवारी प्रोफोलीन हा ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणारा टँकर पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जात होता. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने आडोशी बोगद्याजवळ पलटी झाला. गळती होत असलेला गॅस हवेत वेगाने पसरत असल्यामुळे अग्निशमन दलाने खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील वीज पुरवठा आणि वाहतूक थांबवली होती. ही गळती पूर्णपणे थांबवण्यासाठी तज्ज्ञांचे पथक आणि कंपनीचे इंजिनिअर्स घटनास्थळी दाखल झाले होते. तज्ज्ञांच्या देखरेखीखाली गॅस गळतीची तपासणी आणि टँकर उचलण्याचे अत्यंत क्लिष्ट काम पूर्ण होण्याच्या या संपूर्ण प्रक्रियेला ३२ तास लागले.

या भीषण कोंडीचा फटका एक्सप्रेस वेसह जुन्या पुणे-मुंबई महामार्गालाही बसला. गेल्या ३२ तासांपासून दीड लाख वाहने रस्त्यातच अडकून पडली होते. त्यामुळे या सर्व प्रवाशांचे, विशेषतः महिला, लहान मुले आणि वृद्धांचे अन्न-पाण्याविना प्रचंड हाल झाले. अनेक वाहनचालक रात्रभर कोंडीत अडकल्यामुळे थकले होते. तर काही चालकांनी हताश होऊन रस्त्याच्या मधोमध वाहने उभी करून झोप घेतली. सद्यस्थितीत मुंबई पुणे एक्सप्रेस वे सह जुन्या मुंबई पुणे हायवेवरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे. मात्र तरीही वाहतुकीत अडथळे तसेच आहेत.

शिस्तीत वाहने चालवावीत

सध्या मुंबई आणि पुणे अशा दोन्ही मार्गांवरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. बोरघाट विभाग आता टँकरमुक्त झाला असला तरी मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी पाहायला मिळत आहे. ही गर्दी पाहता रस्ता पूर्णपणे क्लिअर होण्यासाठी आणखी २ ते ३ तास वेळ लागण्याची शक्यता आहे. वाहतूक पोलीस सध्या घटनास्थळी तैनात असून टप्प्याटप्प्याने वाहने पुढे सोडली जात आहेत. चालकांनी घाई न करता शिस्तीत वाहने चालवावीत, असे आवाहन बोरघाट महामार्ग पोलिसांनी केले आहे.

Follow Us