
Mumbai Monorail : मुसळधार पावसामुळे मुंबई पाण्याखाली गेली आहे. मध्य रेल्वेची लोकल सेवाही चांगलीच स्लो झालेली आहे. परिणामी रेल्वे स्थानकावर लोकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. असे असताना आता चेंबूर-भक्तीपार्कदरम्यानची मोनोरेल मध्येच थांबवल्याचे समोर आले आहे. ही मोनोरेल नेमकी का थांबवली, हे मात्र अद्याप समोर आलेले नाही. मात्र मिळालेल्या माहितीनुसार मोनोरेलमधील एसीही बंद पडल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या ताज्या माहितीनुसार चेंबूर ते भक्तीमार्ग यादरम्यानची मोनोरेल मध्येच थांबवण्यात आली आहे. या मोनोरेलमध्ये भरपूर सारे प्रवासी आहेत. अचानक मोनोरेल थांबल्यामुळे प्रवाशांत घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे.
गेल्या पाऊण तासापासून ही मोनोरेल अडकून पडलेली आहे. चेंबूर आणि भक्तीपार्कदरम्यान ही मोनोरेल थांबवण्यात आलेली आहे. या मोनोरेलमध्ये अनेक वृद्ध, महिला, लहान मुलं असून प्रवाशांचा श्वास गुदरमत आहे. या मोनोरेलमधील एसीही बंद पडल्याचे म्हटले जात आहे.
अचानकपणे मोनोरेल थांबवण्यात आल्याने लोकांमध्ये सध्या घबराटीचे वातावरण आहे. मोनोरेलमधील प्रवाशांनी आपत्कालीन विभागाला कॉल केल्यानंतर लवकरच आम्ही मदतीला पोहोचत आहोत, असे सांगितले जात आहे. आता हा आपत्कालीन क्रमांक बंद येत असल्याचाही दावा प्रवाशांकडून केला जातोय. ही मोनोरेल नेमकी का थांबवण्यात आली, याचे ठोस कारण अद्याप समजू शकलेले नाही.
या मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांच्या माहितीनुसार थांबवण्यात आलेली ही मोनोरेल एका बाजून झुकलेली आहे. त्यामुळे अपघाताचीही भीती या ठिकाणी व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळी मदत पोहोचवली जात असून थांबवण्यात आलेल्या मोनोरेलला ओढत नेले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
मोनोरेल अचानकपणे थांबल्यानंतर प्रवाशांनी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला आहे. काही प्रवाशांनी पोलिसांनाही कॉल करण्याचा प्रयत्न केला. काही प्रवाशांनी अग्निशमन दलालाही कॉल केला. मात्र अद्याप कोणतीही मदत पोहोचली नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता मोनोरेलमधील प्रवाशांना सुखरूप कसे काढले जाईल, अशी विचारणा केली जात आहे.