
मुंबईतील ग्लोबल पॅगोडा-एस्सेल वर्ल्ड जेट्टी रोडजवळ शुक्रवारी रात्री एका वडापाव विक्रेत्याची जागेच्या आणि स्टॉलच्या वादातून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली. गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या मालमत्ता आणि स्टॉलवरील कथित अतिक्रमणाच्या वादातून हे अत्यंत क्रूर कृत्य घडले. दशरथ चव्हाण असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दशरथ चव्हाण हे मुंबईतील पॅगोडाजवळ संस्कार कॅफे नावाचा वडापावचा स्टॉल चालवायचे. काल रात्री ११.२० वाजताच्या सुमारास त्यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यांच्याशी पाच वर्षांपासून तीव्र वाद असलेल्या प्रतिस्पर्धी कुटुंबातील सदस्यांनी हे कृत्य केल्याचा आरोप आहे. दशरथ चव्हाण यांच्या पत्नी संगिता चव्हाण यांनी याबद्दल पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
त्यानुसार, प्रतिस्पर्धी स्टॉल चालवणाऱ्या रोझबर्ड मिरांडा, तिचा पती रोलँड मिरांडा, त्यांची मुलगी रोबिना परेरा, जावई जोबी परेरा आणि त्यांचा चालक पवन शर्मा यांनी दशरथ चव्हाण यांच्यावर हल्ला केला. दशरथ चव्हाण यांनी नुकताच त्यांचा स्टॉल पुन्हा सुरू केल्यानंतर काही वेळातच या सर्वांनी त्यांना घेरले. त्यानंतर चव्हाण यांना खाली पाडून त्यांच्या छातीवर, पोटात, पाठीवर, डोक्यावर आणि तोंडावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. हे सर्व त्यांच्या पत्नी आणि कर्मचाऱ्यांसमोर घडले. पण ते काहीही करू शकले नाहीत. यानंतर चव्हाण यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र मध्यरात्री १२.१८ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पोलिसांच्या सूत्रांनुसार, मिरांडा कुटुंबियांनी ग्लोबल पॅगोडा परिसरात खारफुटीची जमीन टाकून सरकारी जागेवर अतिक्रमण केले होते. तसेच या जागेत त्यांनी एक दुकान बांधले होते. चव्हाण यांनी या विरोधात वन विभाग तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे तक्रार केली होती. चव्हाण यांच्या तक्रारीनंतर मिरांडा कुटुंबाचे बांधकाम पाडण्यात आले.
त्यानंतर मिरांडा कुटुंबानेही चव्हाण यांच्या स्टॉलविरुद्ध बीएमसीकडे तक्रार केली. ज्यामुळे काही दिवसांपूर्वी चव्हाण यांचा स्टॉलही पाडण्यात आला. शुक्रवारी रात्री दशरथ चव्हाण आपला पाडलेला स्टॉल पुन्हा बांधण्यासाठी त्या जागेवर परतले असताना मिरांडा कुटुंबाने त्यांच्यावर हल्ला केला, अशी माहिती समोर आली आहे. यानंतर आता याप्रकरणी गोरई पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक महेश निवातकर यांनी मिरांडा कुटुंबातील सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.