
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य स्त्रोतांपैकी एक असलेल्या पिसे येथील यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले आहे. या पार्श्वभूमीवर येत्या २७ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ या १२ दिवसांच्या कालावधीत ही दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे मुंबई शहर, पूर्व उपनगरे आणि शेजारील शहरांमध्ये १० टक्क्यांहून अधिक पाणीकपात लागू होणार आहे. मुंबईतील अनेक भागांसह ठाणे आणि भिवंडीत पाणीकपात लागू करण्यात आली आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील बंधाऱ्यावर न्यूमॅटिक गेट सिस्टिम बसवण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे तलावातील पाण्याची पातळी नियंत्रित करणे सोपे जाते. या गेट्सच्या कार्यक्षमतेसाठी दरवर्षी त्यांचे तांत्रिक परीक्षण आणि परिरक्षण (Maintenance) करणे अनिवार्य असते. हे काम पूर्ण होईपर्यंत पाणी उपसा करण्यावर मर्यादा येत आहे, असे असल्याने कपात जाहीर करण्यात आली आहे.
१. मुंबई शहर विभाग (१० टक्के कपात)
दक्षिण मुंबई: ‘ए’ विभागातील नेव्हल डॉकयार्ड परिसर आणि ‘बी’ विभागातील मोहम्मद अली मार्ग, डोंगरी या भागांत पाणी कमी दाबाने येईल.
मध्य मुंबई: ‘सी’ विभागातील भेंडी बाजार, बोहरी मोहल्ला; ‘ई’ विभागातील भायखळा, मदनपुरा, आग्रीपाडा, चिंचपोकळी आणि रे रोड परिसरात कपात असेल.
परळ-लालबाग: ‘एफ दक्षिण’ आणि ‘एफ उत्तर’ मधील परळ, लालबाग, हिंदमाता, माटुंगा, शीव आणि वडाळा या गजबजलेल्या भागात पाणी कमी असेल.
२. पूर्व उपनगरे (१० टक्के कपात)
मुलुंड (टी वॉर्ड) : भांडुप, नाहूर, कांजूरमार्ग, विक्रोळी (एस वॉर्ड) आणि घाटकोपर (एन वॉर्ड) या भागांत पुरवठा विस्कळीत राहील.
कुर्ला पूर्व (एल वॉर्ड) : तसेच मानखुर्द, गोवंडी, देवनार (एम पूर्व) आणि चेंबूर, टिळकनगर (एम पश्चिम) विभागातही पाण्याचे वेळापत्रक बदलणार आहे.
मुंबई महापालिकेकडून ठाणे आणि भिवंडी महापालिकेच्या काही भागांना पाणीपुरवठा केला जातो. या दुरुस्तीमुळे ठाणे शहराचा पाणीपुरवठा थेट २० टक्क्यांनी कमी होणार आहे. परिणामी, ठाण्यातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पाणी कमी दाबाने येईल किंवा ठराविक वेळच उपलब्ध असेल, अशी माहिती समोर आली आहे.
महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, दुरुस्तीचे काम तातडीचे आणि महत्त्वाचे आहे. या काळात नागरिकांनी आधीच पाणी साठवून ठेवावे, पिण्याच्या पाण्याचा वापर जपून करावा आणि कपातीच्या काळात पाण्याचा अपव्यय टाळून प्रशासनास सहकार्य करावे, अशी माहिती महापालिकेने दिली आहे. येत्या ७ फेब्रुवारी रोजी काम पूर्ण झाल्यानंतर ८ फेब्रुवारीपासून पाणीपुरवठा पुन्हा पूर्ववत होण्याची शक्यता आहे. मात्र तरी सुरुवातीचे १-२ दिवस जलवाहिन्यांमधील हवेच्या दाबामुळे पाणी कमी दाबाने येऊ शकते.