Mumbai Rain: नुसती तगमग… घामाच्या धारा, मुंबईकरांसह ठाणेकरांची कोण करणार दमकोंडी? पुढील 3 दिवस धोका…

Mumbai Heatwaves and Humid Conditions: 'मे' महिन्यात मुंबईकरांना कमी चटके जाणवतील पण, घामाच्या धारा नक्की निघतील. तापमानात किंचित घसरण होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. आर्द्रता वाढल्याने मुंबईकर घामाने चिंब होणार आहे.

Mumbai Rain: नुसती तगमग... घामाच्या धारा, मुंबईकरांसह ठाणेकरांची कोण करणार दमकोंडी? पुढील 3 दिवस धोका...
नुसती तगमग, जीवाची घालमेल
Image Credit source: एजन्सी
| Updated on: May 08, 2026 | 4:19 PM

Mumbai Heatwaves and Humid Conditions: राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचे आणि सोसाट्याचा वारा सुटणार आहे. हवामान विभागाने याविषयीचा अलर्ट दिला आहे.हवामान खात्या नुसार, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रासह कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहतील आणि मुसळधार पाऊस पडेल. कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यात हलका आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. रत्नागिरी, सिंधुदुर्गाच्या किनारपट्टी भागातही पाऊस पडेल. पण मुंबईकर आणि ठाणेकरांच्या नशीबात सध्या पावसाचा शिडकावा नसेल. मुंबईकरांना आर्द्रतेचा सामना करावा लागेल. पावसाच्या धारांनी नाही तर घामाच्या धारांनी त्यांची वैतागवाडी होणार आहे.

मे महिन्यात घामाच्या धारा

मार्च आणि एप्रिल महिन्यात उष्णतेच्या लाटांमुळे तीव्र चटके जाणवले. मात्र, मे महिन्यात तापमान किंचित घसरणार असल्याने कमी चटके बसतील. असे असले तरीही मुंबईत प्रचंड आर्द्रतेमुळे अक्षरशः घामाच्या धारा वाहतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यंदाच्या मे महिन्यात मुंबईतील कमाल तापमान साधारणतः 34 ते 36 अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता आहे, असे हवामान अभ्यासक अश्रेय शेट्टी यांनी सांगितले. एप्रिलमधील तीव्र उकाड्याच्या तुलनेत वातावरण काहीसे सौम्य राहील. त्यामुळे उष्णतेची लाट येण्याची शक्यता नाही. मात्र आर्द्रता अधिक असेल. त्यामुळे मुंबईला किंचित त्रास होईल; पण मार्च आणि एप्रिलच्या तुलनेत दिलासा असेल, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला.

मुंबईला यलो अलर्ट

उष्ण आणि दमट वातावरणामुळे मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, आणि पालघरमध्ये आजपासून ते 10 मे पर्यंत यलो अलर्ट जारी केला आहे. तर तळकोकणातील काही भागातही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 8, 9, 10 मे रोजी मुंबई महानगर प्रदेशातील अनेक भागात उच्च आर्द्रता आणि दिवसाचे तापमान अधिक असल्याने जीवाची लाही लाही होईल आणि तगमग वाढेल. या काळात हवा अधिक प्रमाणात नसल्याने मुंबईकर उकाड्याने हैराण होतील.

या जिल्ह्यात पावसाची शक्यता

तर बीड, लातूर धाराशिव, कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्गाच्या किनारपट्टी भागात येत्या तीन दिवसात मुसळधार पाऊस पडेल. 8, 9, 10 मे रोजी या जिल्ह्यात मुसळधार, हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर त्याचवेळी ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहतील. नागरिकांना हवामान विभागाने हा अलर्ट जारी केला आहे.

Follow Us