12 फेब्रुवारी रोजीच विलिनीकरण झालं असतं, तटकरेंचा मोठा दावा; हॉस्पिटलमध्ये काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठा दावा केला आहे की, जर अजित पवार हयात असते, तर 12 फेब्रुवारी रोजीच राष्ट्रवादीचे विलिनीकरण झाले असते. अजितदादांनी त्यांना याची पूर्वकल्पना दिली होती. छगन भुजबळ यांनी विलिनीकरणाच्या बैठकांबद्दल केलेला दावा खरा असल्याचे तटकरेंनी म्हटले आहे.

अजित पवार जिवंत असते तर 12 फेब्रुवारी रोजीच राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं असतं. अजितदादांनी मला तशी पूर्व कल्पना दिली होती, असा मोठा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे. तसेच विलिनीकरणाबाबत छगन भुजबळ यांनी केलेला दावाही खरा आहे. विलिनीकरणाच्या बैठका झाल्या होत्या, असा पुनरुच्चारही तटकरे यांनी केला आहे. तटकरे यांनी आज पुन्हा एकदा विलिनीकरणाच्या मुद्द्याला हवा दिल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
अजित पवार आणि जयंत पाटील यांची विलिनीकरणावर चर्चा झाली होती, असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे. सुनील तटकरे यांनी भुजबळ यांचा हा दावा खरा असल्याचं म्हटलं आहे. छगन भुजबळ यांची शस्त्रक्रिया एशियन हॉस्पिटलला झाली. तेव्हा मी त्यांना भेटायला गेलो होतो. त्या आधीच अजित दादा आणि जयंतराव पाटलांची भेट झाली होती. विलिनीकरणाची बैठक झाली होती, असं भुजबळ सांगतात ते खरं आहे. कारण भुजबळांनी हॉस्पिटलमधूनच चर्चेत भाग घेतला असेल. त्यामुळे त्यांनी काही चुकीचं सांगितलं असं वाटत नाही, असं सुनील तटकरे म्हणाले.
मी आणखी बोलणार
अजितदादा असते तर 12 फेब्रुवारी रोजी विलिनीकरण झालं असतं. दादांनी मला विलिनीकरणाची पूर्व कल्पना दिली होती, असं सांगतानाच अजितदादा गेल्यानंतर मी यावर का बोललो नाही? असा सवाल केला जात आहे. पण मी तेव्हा बोललो नाही, आता बोलत आहे… या प्रश्नात काही तथ्य नाही. कोणत्यावेळी काय बोलावं याची मला समज आहे. हा ज्याचा त्याचा विषय असतो. योग्यवेळी आणखी बोलणार आहे, असं तटकरे यांनी स्पष्ट केलं.
सामंताना मंत्री बनवण्यात…
शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी केलेल्या टीकेचाही समाचार घेतला. उदय सामंत हे राष्ट्रवादीतील माझे एकेकाळचे सहकारी होते. मी काय बोलावं आणि काय नाही बोलावं यावर त्यांनी बोलायची गरज नाही. कारण आमचा पक्ष वेगळा आहे. त्यांचा पक्ष वेगळा आहे. आम्ही त्याच्या पक्षाबाबत कधी बोलत नाही. आम्ही एकनाथ शिंदे यांचा आदर राखतो. मी काय बोललो त्यावर इतरांना बोलण्याचा अधिकार काय आहे? ते लोकशाही आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. त्यांना मंत्री करण्यात आमचा थोडासा वाटा होता. नसेल तर त्यांनी सांगावं, असा टोला त्यांनी लगावला.