डोंबिवलीकरांचा आवाज सुप्रिया सुळेंनी संसदेत मांडला

| Updated on: Dec 03, 2019 | 4:35 PM

लोकसभेतील शून्य प्रहरामध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी डोंबिवली लोकलचा मुद्दा उपस्थित केला.

डोंबिवलीकरांचा आवाज सुप्रिया सुळेंनी संसदेत मांडला
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी डोंबिवली रेल्वे स्थानकात लोकलमध्ये होणाऱ्या गर्दीचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला. लोकलच्या संख्या वाढवण्याची मागणी सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule on Dombivali Local) संसदेत केली. आता रेल्वे मंत्रालय यासंदर्भात काय पावलं उचलतं, याकडे तमाम डोंबिवलीकरांचे डोळे लागले आहेत.

लोकसभेतील शून्य प्रहरामध्ये सुप्रिया सुळेंनी लोकलचा मुद्दा उपस्थित केला. सुळेंनी यासंदर्भातील पत्र ट्वीट करुन माहिती दिली. डोंबिवलीकडे जाणाऱ्या आणि डोंबिवली स्थानकातून सुटणाऱ्या लोकलची संख्या वाढवण्यात यावी, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी संसदेत केली.

डोंबिवली लोकलमध्ये प्रमाणापेक्षा जास्त होणाऱ्या गर्दीचा आणि लोकल वेळापत्रकाचं पालन करण्यात होणाऱ्या दिरंगाईचा मुद्दा नियम 377 अंतर्गत उपस्थित केला आहे. डोंबिवलीकडे जाणाऱ्या आणि डोंबिवली स्थानकातून सुटणाऱ्या लोकलची संख्या वाढवण्याची मागणी केंद्राकडे केली आहे, असं सुप्रिया सुळेंनी ट्विटरवर लिहिलं आहे.

पत्रात काय आहे ?

काही महिन्यांपूर्वी सुरु करण्यात आलेल्या डोंबिवली-सीएसएमटी लोकल ट्रेनमध्ये होणाऱ्या गर्दीचा मुद्दा मला उपस्थित करायचा आहे. या लोकलचं नामकरण डोंबिवली लोकल असल्यामुळे ती डोंबिवली स्थानकातून सुटणं अपेक्षित आहे, परंतु ही लोकल कल्याणहून सुटते. यामुळे डोंबिवलीला पोहचेपर्यंत लोकल गर्दीने भरुन जाते. त्यामुळे डोंबिवलीतील प्रवाशांना बसायलाही जागा उरत नाही. अनेकदा लोकल ट्रेन लांब पल्ल्याच्या प्लॅटफॉर्मवर थांबलेल्या असतात. त्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडतो. लोकल बरेच वेळा उशिरानेही धावतात. रेल्वे अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रार करुनही काहीच कारवाई करण्यात
आलेली नाही. हा मुद्दा तातडीने शून्य प्रहरात मांडायचा आहे, असं पत्रात (Supriya Sule on Dombivali Local) लिहिलं आहे.