#Happy2020 : मुंबईसह देशभरात नववर्षाचं जल्लोषात स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गजांनी ट्विटरच्या माध्यमातून जनतेला शुभेच्छा दिल्या.

#Happy2020 : मुंबईसह देशभरात नववर्षाचं जल्लोषात स्वागत
| Updated on: Jan 01, 2020 | 8:08 AM

मुंबई : मुंबई-पुण्यासह देशभरात मोठ्या जल्लोषामध्ये नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं. रात्री बाराच्या ठोक्याला एकच गलका करत सर्वांनी सरत्या वर्षाला निरोप दिला आणि ‘2020’ चं उत्साहाने स्वागत केलं. (New Year Celebration)

कुठे हॉटेल किंवा रिसॉर्टवर कौटुंबिक सेलिब्रेशन करण्यात आलं, तर कुठे रिसॉर्टवर एकत्र जमून मित्र-मंडळींनी ‘थर्टी फर्स्ट’ साजरा केला. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, वरळी सीफेस, शिवाजी पार्क, सीएसएमटी रेल्वे स्टेशन यासारख्या अनेक ठिकाणी सेलिब्रेशनच्या निमित्ताने गजबज पाहायला मिळाली.

मुंबईतल्या समुद्र किनाऱ्यांवर मंगळवारी संध्याकाळपासूनच वर्षातील अखेरचा सूर्यास्त पाहण्यासाठीही गर्दी जमली होती. विशेष म्हणजे हा उत्साह मध्यरात्रीपर्यंत कायम होता. मुंबईकरांच्या सोयीसाठी विशेष लोकल सोडण्यात आल्या. पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे रात्रभर नागरिकांनी निर्धास्तपणे सेलिब्रेशन केलं.

अनेक जणांनी घरच्या घरी पार्टी करत सोशल मीडियावरुनच मित्र मंडळींना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणं पसंत केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गजांनी ट्विटरच्या माध्यमातून जनतेला शुभेच्छा दिल्या.

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर, शिर्डीतील साईबाबा मंदिर, पंढरपुरातील विठ्ठल-रखुमाई मंदिर यासह अनेक देवस्थानांमध्येही भाविकांनी गर्दी केली होती. देवाचं दर्शन घेऊन नववर्षाचं स्वागत करण्यावर काही जणांचा भर होता. New Year Celebration