मला लोकलमध्ये गर्दी नको; तूर्तास लोकल सुरु न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत

| Updated on: Oct 11, 2020 | 2:38 PM

लोकलची संख्या वाढल्यावर अधिक प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी देऊ.

मला लोकलमध्ये गर्दी नको; तूर्तास लोकल सुरु न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत
Follow us on

मुंबई: कार्यालयात जाण्यासाठी मुंबईतील लोकल ट्रेन सुरु होणार का, याकडे डोळे लावून बसणाऱ्या चाकरमान्यांची रविवारी साफ निराशा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तूर्तास लोकल ट्रेन सुरु न करण्याचे संकेत दिले आहेत. सर्वांनाच लोकल हवी आहे, पण मला गर्दी नको. त्यामुळे सध्या आपण लोकलची संख्या वाढवण्यावर भर देणार आहोत. ही संख्या वाढल्यावर त्यात आणखी लोकांना प्रवास करण्याची परवानगी देऊ, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. (No relief for Mumbai local train commuters )

त्यामुळे १५ ऑक्टोबरनंतर मुंबईतील लोकल ट्रेन सुरु होणार असल्याच्या चर्चांना तूर्तास पूर्णविराम मिळाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या केवळ डॉक्टर्स, अत्यावश्यक सेवा आणि मोजक्या सरकारी कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा आहे. परिणामी सामान्य लोकांना कार्यालय गाठण्यासाठी रस्ते वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र, यामुळे रस्ते वाहतुकीवर प्रचंड ताण येताना दिसत आहे. रस्त्यावरील खड्डे आणि वाहतूक कोंडी यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे लोकल ट्रेन लवकरात लवकर सुरु व्हाव्यात, अशी मागणी सामान्य लोकांकडून सातत्याने केली जात आहे.

मंदिरांच्याबाबतही हळूवारपणे पावले उचलणार- मुख्यमंत्री
राज्यातील मंदिर सुरु करण्याबाबत सध्या आम्ही हळूवारपणे पावले उचलत आहोत. अनेकजण हे सुरु झालं, मग ते का नाही, असे प्रश्न विचारत आहेत. मात्र, त्यांनी शांत बसावे. सरकार चालवण्याची जबाबदारी तुमच्यावर नव्हे तर आमच्यावर आहे. आम्हाला जनतेची काळजी आहे. उगाच तंगड्यात तंगडं घालण्याची सवय नाही. आपण सर्व दारे हळुवार उघडतोय. या दारांतून सुबत्ता आणि समृद्धी आली पाहिजे. योग्य काळजी न घेतल्यास या दारांतून कोरोना शिरेल. त्यामुळे राज्यातील मंदिरे सुरु करण्याबाबत योग्यवेळी निर्णय घेतला जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

‘ज्या गोष्टी सुरू करतोय त्या पुन्हा बंद करण्याची वेळ येऊ देऊ नका’
परदेशात काही ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. ब्रिटनमध्ये तर सहा महिने लॉकडाऊन राहणार आहे. त्यामुळे आपल्याकडेही ज्या गोष्टी सुरु झाल्यात त्या पुन्हा बंद करण्याची वेळ येऊ देऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मास्क हवा की लॉकडाऊन हवा, सोशल डिस्टन्सिंग हवं की लॉकडाऊन हवं, कामावर जायचंय की लॉकडाऊन हवा, याचा विचार तुम्हीच करा, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

मोठी बातमी: मेट्रोची कारशेड आरेत नव्हे कांजूरमार्गला होणार; उद्धव ठाकरेंची घोषणा

लोकल सुरु करण्यासाठी तातडीने धोरण आखा; मंत्र्यांवरही जबाबदारी सोपवा- हायकोर्ट

(No relief for Mumbai local train commuters)