कधी कधी काही शिक्षा वेगळ्या पद्धतीने होतात…पंकजा मुंडेंनी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर प्रथमच केले भाष्य

pankaja munde: प्रितमच्या बाबतीत मी आता काही बोलणार नाही. युतीमध्ये मलाच कुठे जागा नाही. म्हणून मी विधान परिषदेवर गेले आहे. प्रितम बाबात पक्ष निर्णय घेईल, असे प्रितम मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीसंदर्भात पंकजा यांनी सांगितले.

कधी कधी काही शिक्षा वेगळ्या पद्धतीने होतात...पंकजा मुंडेंनी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर प्रथमच केले भाष्य
pankaja munde
| Updated on: Sep 25, 2024 | 12:35 PM

बदलापूर येथील चिमुकली अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचे सोमवारी एन्काऊंटर झाले. त्या प्रकरणाची राज्य सरकारने चौकशी सुरु केली आहे. विरोधक या एन्काऊंटर प्रश्न उपस्थित करत आहेत. बदलापूरमधील नागरिकांनी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर जल्लोष केला. आता या प्रकरणावर भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आमदार पंकजा मुंडे यांनीही भाष्य व्यक्त केले आहे. बदलापूरमधील अत्याचार प्रकरणात कायद्याने छडा लावून आरोपीला शिक्षा होणार होती. परंतु त्यापूर्वी एन्काऊंटर झाली. यावर चौकशी होईल. त्यातून काय ते सत्य बाहेर येईल. परंतु पोलिसांच्या अंगावर कोणी धावून गेले तर पोलिसांचे मनोबल राखणेही आवश्यक होते. त्यांच्या पाठिशी उभे राहणे आवश्यक आहे. कधी कधी काही शिक्षा वेगळ्या पद्धतीने होतात. न्याय लोकांना अपेक्षित होता, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

आरक्षणावर केले भाष्य

एसटीमधून धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी समिती स्थापन झाली आहे. त्यावर अधिकृत माहिती आल्याशिवाय चर्चा करणार नाही. राज्य शासनाच्या प्रस्तावानंतर केंद्र शासन विचार करतो, अशी प्रक्रिया असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले. आरक्षण कुणाला कसे मिळावे यासाठी कायदा आहे. कायद्याची चौकटीत बसवून आरक्षण द्यावे लागते.

प्रितम मुंडेबाबत म्हणाल्या…

प्रितमच्या बाबतीत मी आता काही बोलणार नाही. युतीमध्ये मलाच कुठे जागा नाही. म्हणून मी विधान परिषदेवर गेले आहे. प्रितम बाबात पक्ष निर्णय घेईल, असे प्रितम मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीसंदर्भात पंकजा यांनी सांगितले. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या जागवाटपा संदर्भात लवकरच अधिकृत घोषणा होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

राज्यात अनेक ठिकाणी देवा भाऊ…, असे बॅनर लागले आहेत. त्यावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की,
कार्यकर्ते असे बॅनर लावत आहेत. संवैधानिक पदावरील व्यक्ती असे करणार नाही. त्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे श्रेय घेतले जात नाही. ही योजना राज्य सरकारची आहे. राज्य सरकारमध्ये तिन्ही पक्ष आहेत. त्यामुळे या योजनेचे श्रेय तिन्ही पक्षांना आहे. आमदार टेकचंद सावरकर यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात वक्तव्य केले आहे. महिलांची मते घेण्यासाठी ही योजना असल्याचे म्हटले आहे. त्यावर बोलण्यास पंकजा मुंडे यांनी नकार दिली. मी टेकचंद सावरकर यांचे वक्तव्य ऐकले नाही, असे त्यांनी म्हटले.