मीसुद्धा वाढीव वीजबिलाची शिकार, दुतोंडी सरकारने आश्वासन पूर्ण करावं : पंकजा मुंडे

| Updated on: Nov 16, 2020 | 6:33 PM

"हे सरकार दुतोंडी आहे. सरकार आश्वासन देतं मात्र, पूर्ण करत नाही. वाढीव वीजबिलाची मी सुद्धा शिकार आहे." असं म्हणत वाढीव वीजबिलाच्या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केली.

मीसुद्धा वाढीव वीजबिलाची शिकार, दुतोंडी सरकारने आश्वासन पूर्ण करावं : पंकजा मुंडे
Follow us on

मुंबई : “हे सरकार दुतोंडी आहे. सरकार आश्वासन देतं मात्र, पूर्ण करत नाही. वाढीव वीजबिलाची मीसुद्धा शिकार आहे,” असं म्हणत वाढीव वीजबिलाच्या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केली. मुंडे यांनी आशा सदन अनाथाश्रमाला भेट दिली. दिवाळीनिमित्त त्यांनी अनाथ मुलांना खाऊ दिला. यावेळी मुंडे बोलत होत्या. (Pankaja Munde slams government on issue of increased electricity bill)

लॉकडाऊनच्या काळात वाढीव वीजबिल आल्याने राज्यातील कित्येक नागरिक त्रस्त आहेत. वाढीव आलेले वीजबिल कमी करण्याची मागणीही राज्यातील नागरिकांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सरकारवर घणाघाती टीका केली. त्यांनी ठाकरे सरकार दुतोंडी असल्याचा आरोप केला. “राज्यातील सरकार दुतोंडी आहे. सरकार फक्त आश्वासन देतं मात्र त्याची पूर्तता करत नाहीत. वाढीव बिलाची मीसुद्धा शिकार आहे. राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी वाढीव वीजबिलाबाबत लक्ष घालावं” असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

राज्यात वाढीव वीजबिलाबाबत शेतकरी आणि नागरिकांमधून रोष व्यक्त होतोय. लॉकडाऊन काळातील आलेले वाढीव वीजबिल माफ करावे अशी मागणी विरोधकांनी वेळावेळी केली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही वाढीव वीजबिलाच्या प्रश्नावरुन 29 ऑक्टोबर रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती . यावेळी त्यांची वाढीव वीजबिलासंदर्भात राज्यपालांशी चर्चा झाली होती. “मी वीजबिलाच्या प्रश्वावरुन राज्यपालांना भेटलो. याबाबत लवकरात लवकर निर्णय व्हावा. जर वेळ पडली तर मी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही भेटणार,” असं राज ठाकरे म्हणाले होते.

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी आशा सदन अनाथाश्रमाला भेट दिली. त्यांनी येथील अनाथ मुलांना खाऊ दिला. “कोरोनाच्या संकटकाळी मुलांना मदत दिल्यावर त्यांनाही आणि आपल्यालाही आनंद होतो. मी माझी दिवाळी नेहमीच गरीब, कष्टकरी, अनाथ मुलांबरोबर साजरी करते,” असं त्या म्हणाल्या.

संबंधित बातम्या :

विधानपरिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक, पंकजा मुंडे समर्थकाचा अर्ज बाद

भाजपकडून राज्य प्रभारींची यादी जाहीर; पंकजा मुंडे यांची मध्य प्रदेश सह प्रभारीपदी नियुक्ती

भाजप हा माझ्या बापाचा पक्ष, त्याचा मला अहंकार नाही तर प्रेम : पंकजा मुंडे

(Pankaja Munde slams government on issue of increased electricity bill)