Raj Thackeray: राज ठाकरेंविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा, कोर्टात याचिका दाखल

Raj Thackeray Sedition Case: राज ठाकरे यांच्या विरोधात राजद्रोहाअंतर्गत एफआयआर दाखल करण्यात यावा, अशी मागणी करणारा याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

Raj Thackeray: राज ठाकरेंविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा, कोर्टात याचिका दाखल
राज ठाकरेंविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा, कोर्टात याचिका दाखल
Image Credit source: ani
| Updated on: May 06, 2022 | 1:36 PM

मुंबई: भोंग्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता दिसत आहे. राज ठाकरे यांच्या विरोधात राजद्रोहाअंतर्गत एफआयआर दाखल करण्यात यावा, अशी मागणी करणारा याचिका मुंबई उच्च न्यायालयात (mumbai high court) दाखल करण्यात आली आहे. औरंगाबादच्या (aurangabad) रॅलीत राज ठाकरे यांनी चिथावणीखोर भाषण दिलं होतं. त्याअनुषंगाने त्यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या याचिकेवर आजच सुनावणी सुरू होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच या आधी राज ठाकरे यांच्याविरोधात परळी कोर्टाने अजामीनपात्रं वॉरंट जारी केलं आहे. मराठीचा मुद्दा आमि मराठी पाट्यांच्या आंदोलनप्रकरणी त्यांच्याविरोधात हे वॉरंट जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्याची विनंतीही त्यांनी केली आहे. त्यामुळे या याचिकेवर आजच सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. औरंगाबादच्या रॅलीत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विरोधात विखारी टीका केली होती. त्यामुळे राज्यात शांततेचा भंग होऊ शकतो. त्यामुळे राज ठाकरे यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, असं हेमंत पाटील यांनी सांगितलं.

 

वाद काय?

दरम्यान, राज ठाकरे यांनी एक मे महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये रॅलीचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज ठाकरे यांनी भोंग्याच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला अल्टिमेट दिला होता. मशिदींवरील भोंगे उतरले नाही तर जे व्हायचं ते होऊ द्या. पण भोंगे हटवलेच पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले होते. यावेळी राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरही टीका केली होती. राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच राज्यात जातीयवाद निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला होता.

तसेच शरद पवार हे नास्तिक असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला होता. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि लोकमान्य टिळक यांना तुम्ही ब्राह्मण म्हणूनच पाहाणार आहात का? असा सवालही त्यांनी केला होता. लोकमान्य टिळकांनी शिवाजी महाराजांची समाधी बांधल्याचा दावाही राज ठाकरे यांनी केला होता. त्यानंतर अनेक इतिहासकारांनी राज ठाकरे यांचा हा दावा फेटाळून लावला होता. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुले यांनी शोधून काढली होती. शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी टिळकांनी निधी गोळा केला होता. मात्र, त्यांनी कधीही ही समाधी बांधली नाही, असं इतिहासकारांनी पुराव्यासहीत स्पष्ट केलं होतं.